महाराष्ट्र-गुजरात सीमेवर उच्छल येथे बोट उलटल्याने 13 जण बुडाले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागातील उच्छल तापी नदीच्या बॅकवॉटरमध्ये बोट उलटून 13 जण बुडाले. या दुर्घटनेनंतर बुडणाऱयांचा आरडाओरडा ऐकून स्थानिक ग्रामस्थ व मासेमारी करणाऱयांनी घटनास्थळी धाव घेत चार जणांचे प्राण वाचवले. या दुर्घटनेत पिता-पुत्रासह तिघांचा घटनास्थळी बूडून मृत्यू झाला, तर चार जण बेपत्ता असल्याची माहिती गुजरात पोलिसांनी दिली.

मंगळवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास तापी नदीच्या उकाई धरणातील बॅकवॉटरजवळील भिंतखुर्द गावाजवळ ही घटना घडली. तेथे बचावकार्य सुरू झाले असून अंधार पडल्याने बचाव कार्याला अडचणी येत आहेत. पोलीस प्रशासन, महसूल विभागाचे अधिकारी, सुरत येथील अग्निशमन दलाची टीम घटनास्थळी रवाना झाली आहे. मात्र तेथे मोठय़ा प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली आहे.

होळीची सुट्टी असल्याने गुजरातच्या उच्छल तालुक्यातील सुंदरपूर येथील परिवार सहलीसाठी उकाई धरणात बोटिंग करायला गेला होता. भिंतखुर्द गावाजवळ वेगाने वारा आल्याने बोट अनियंत्रित होऊन उलटली अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. यावेळी मोठय़ा प्रमाणात वाचवा वाचवा अशी आरडाओरड झाल्याने गावाजवळील ग्रामस्थांनी पाण्यात उडय़ा मारल्या आणि सहा जणांना वाचवले. सुंदरपूर नवापूर शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर आहे. या दुर्घटनेमुळे सुंदरपूर गावात शोकाकुल वातावरण आहे. या घटनेत नवापूर तालुक्यातील दोन जणांचा समावेश आहे.

मृतांमध्ये पिता-पुत्र

एंजल्स कोकणी (15, रा. सुंदरपूर), राकेश बळीराम कोकणी ( 32, रा सुंदरपूर, ता.उच्छल, गुजरात), एकाची ओळख पटलेली नाही. राकेश भारतीय स्टेट बँकेत शिपाई म्हणून नोकरी करीत होते.