विदर्भाचे वैभव

51

अनंत सोनवणे,[email protected]

नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे विदर्भातल्या वनवैभवाचा मुकुटमणी मानलं जातं… विविध प्रकारच्या स्थानिक तसंच स्थलांतरित पक्ष्यांचं हे प्रमुख आश्रयस्थान आहे….

वनतपस्वी मारुती चित्तमपल्ली यांच्या पुस्तकांमधून नवेगावच्या जंगलाशी माझी पहिली ओळख झाली. विशेषतः ‘नवेगाव बांधचे दिवस’ वाचताना तोवर न पाहिलेला तो अद्भुत निसर्ग साक्षात डोळय़ांसमोर उभा राहत होता. नवेगावला भेट द्यायचीच, हे तेव्हाच मनाशी निश्चित झालं! पक्षीनिरीक्षकांसाठी नवेगावचं जंगल म्हणजे जणू पंढरपूरच आहे.

नवेगाव राष्ट्रीय उद्यानाचा मुख्य भाग हा डोंगराळ आहे. डोंगराच्या पायथ्याशी विस्तीर्ण नवेगाव तलाव पसरलेला आहे. नवेगाव बांध तलाव आणि इटाडोह धरण हे मोठे जलाशय म्हणजे या उद्यानाचा प्राण. या जलाशयांमध्ये व त्यांच्या आसपास अद्भुत पक्षीजगत वसलं आहे.

मी जेव्हा जेव्हा नवेगावला गेलोय, तेव्हा तेव्हा नवेगाव तलावाजवळ असलेल्या वनविभागाच्या विश्रामगृहात मुक्काम केलाय. अलीकडे या विश्रामगृहांची अवस्था खूपच सुधारलीय. पण पूर्वी काचा फुटलेल्या खिडक्या, कडीकोयंडे, तुटलेले दरवाजे, आखडलेल्या फरशा अशी सारी अवस्था असायची. भवताली जंगल असल्यानं रात्री झोपताना उंदरांची सोबत असायचीच. पण खरं सांगू, यापैकी कशाचाही तेव्हा त्रास जाणवायचा नाही. कारण आपण निसर्गाच्या इतक्या जवळ, एका सर्वांगसुंदर जंगलात मुक्काम केला आहे, या विचारानेच मन थरारून जायचं. शिवाय तलावावर येणाऱया पक्ष्यांच्या निरीक्षणासाठी जाणंही सोपं व्हायचं. आपल्याला आणखी काय हवं!

navegaon-25

पाणपक्ष्यांच्या दृष्टीने नवेगाव म्हणजे स्वर्गच. इथं चिलखे, चक्रवाक, लालसरी, सरगे, चतुरंग बदक, पट्ट कादंब, कलहंस, रोहित, कठेरी चिलखे, स्नाईप, कुरल, सुरय, तुतारी, करकोचे, सामान्य क्रौंच असे अनेक पक्षी पाहायला मिळतात. त्यांना पाहायला नवेगावला हिवाळय़ात भेट द्यायला हवी कारण हे सारे हिवाळी स्थलांतरित पक्षी आहेत. याशिवाय इथं काळा व लाल बगळे, पाणकावळे, ढोकरी, पोपट, तांबट, टकाचोर, कोतवाल, मुनिया, नीलपंख, राखी धनेश असे इतरही सुमारे 300 जातींचे पक्षी पाहायला मिळतात.

नवेगावच्या जंगलात मोठा धनेशची वीण होते. हा देखणा पक्षी मध्य हिंदुस्थानात फारसा आढळत नाही. पण नवेगावच्या जंगलाला त्यानं अपवाद केलं आहे. सारस क्रौंच हा असाच आणखी एक सुंदर पक्षी. नवेगाव तलावाच्या आसपास हा दुर्मिळ पक्षी आढळतो. इथं त्याची घरटीही आढळली आहेत. पक्ष्यांबरोबरच वन्य जीवांच्या बाबतीतही नवेगावचं जंगल आपली काही खास वैशिष्टय़ं बाळगून आहे. काही वर्षांपूर्वी इथं वाघांची संख्या चांगली होती. मात्र त्यांच्या संरक्षण आणि संवर्धनाकडे आवश्यक तेवढ लक्ष पुरवलं गेलं नाही. त्यामुळे आता दुर्दैवानं या जंगलातून वाघ नामशेष झालाय. क्वचित कधीतरी आसपासच्या जंगलांतून एखादा वाघ इथं येतो, असं सांगितलं जातं. इथं बिबटय़ाचा वावर मात्र लक्षणीय आहे. विदर्भात लाजवंती वानर हा प्राणी पहिल्यांदाच नवेगावच्या जंगलात आढळून आला. अतिशय दुर्मिळ असा हा छोटा वानर दक्षिण हिंदुस्थानातल्या सदाहरित जंगलांमध्ये आढळतो. तो नवेगावमध्ये आढळल्यानं या जंगलाची उपयुक्तता ध्यानात येते. याशिवाय नवेगाव तलावात पाणमांजरं आढळतात. मारुती चित्तमल्ली यांनी पाणमांजरांचा अभ्यास इथंच केला होता. नवेगावच्या जंगलात अस्वल, रानडुक्कर, चितळ, तरस, सांबर, नीलगाय, रानगवा, रानकुत्रे, ताडमांजर, खवल्या मांजर, कोल्हा तसंच वटवाघळांचे अनेक प्रकार पाहायला मिळतात.

navegaon-5

सरपटणाऱया प्राण्यांमध्ये पट्टेरी मण्यार ही सापाची दुर्मिळ जात नवेगावच्या जंगलात आढळते. तसंच घोणस, अजगर, पाल, सरडे, कॅमेलियन, घोरपड व सापांचे अनेक प्रकार इथं आढळतात.

नवेगाव राष्ट्रीय उद्यान

प्रमुख आकर्षण…स्थानिक व स्थलांतरित पक्षी

जिल्हा…गोंदीया

राज्य…महाराष्ट्र

क्षेत्रफळ…134 चौ. कि. मी.

निर्मिती…1975

जवळचे रेल्वे स्थानक….गोंदीया

जवळचा विमानतळ…नागपूर

निवास व्यवस्था…वनविभागाची विश्रामगृहे

सर्वाधिक योग्य हंगाम…ऑक्टोबर ते जानेवारी

सुट्टीचा काळ…नाही

साप्ताहिक सुट्टीचा दिवस…नाही

 

आपली प्रतिक्रिया द्या