जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे फाडफाड इंग्लिश, नवघरमध्ये ‘बँक ऑफ वर्ड उपक्रम

नवघर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आता इंग्रजीचे धडे गिरवत आहेत. इंग्रजीची भीती मनातून घालवण्यासाठी शाळेच्या शिक्षिकेने ‘बँक ऑफ वर्ड’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या इंग्रजी शब्द संपदेत वाढ झाली आहे. तसेच स्पेलिंग, पाठांतर, संवाद कौशल्य यामध्ये सुधारणा झाली असून ते आता फाडफाड इंग्रजी बोलू लागले आहेत.

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना फाडफाड इंग्रजी बोलता यावे यासाठी नवघर जिल्हा परिषद शाळेत ‘बँक ऑफ वर्ड’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून शिक्षिका शीतल पाटील या विद्यार्थ्यांना इंग्रजीचे ए टू झेडपर्यंत धडे शिकवत आहेत. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्रप्रमुख अनिल राणे, शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता बैकर, पदवीधर शिक्षिका वृषाली गुरव, अनुजा माने, सहाय्यक शिक्षिका रुपाली लेंडवे, अंकिता जाधव यांनी विशेष मेहनत घेतली.

असा करतात अभ्यास
शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतःहून एक कार्यसंघ तयार केला आहे. बँकेच्या कार्यपद्धतीप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याचे ‘शब्द खाते’ तयार करण्यात आले आहे. दररोज विद्यार्थ्यांकडून इंग्रजी शब्दांचे पाठांतर करून घेण्यात येते आणि त्याची नोंद त्यांच्या खात्यावर केली जाते अशी माहीती शिक्षिका शीतल पाटील यांनी दिली.