नवी मुंबईत एमआयडीसीतील केमिकल कंपनीत भीषण आग, पाच गाड्या घटनास्थळी दाखल

नवी मुंबईतील एमआयडीसीत नवभारत केमिकल कंपनीत भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु आहे. सध्या तरी यात जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही.

नवी मुंबई एमआयडीसीतील नवभारत इंडस्ट्रियल केमिकल कंपनीत मंगळवारी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीची माहिती मिळताच स्थानिक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू होते. एएनआयच्या प्राथमिक अहवालानुसार, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तर आगीच्या या घटनेत मालमत्तेचे नुकसान किंवा जीवितहानी याबद्दल अधिक माहिती नाही. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये इमारतीतून आगीचे लोट आणि धूर निघताना दिसत आहेत.