
सामना प्रतिनिधी। नवी मुंबई
खवय्यांचा लाडका हापूस आंबा आता सर्वसामान्यांच्या हातात आला आहे. येथील बाजार समितीत रोज दीड लाख पेटय़ांची आवक होत असल्याने हापूसचे भाव डझनामागे 300 ते 400 रुपये इतके गडगडले असून आता हापूस फक्त शंभर रुपये डझनाने विकला जात आहे. म्हणजेच एक हापूस मिळतोय तो अवघ्या 8 रुपये 33 पैशांत. तेव्हा मागवा डझनाची पेटी आणि हापूसवर ताव मारा बिनधास्त.
देवगड आणि रत्नागिरी हापूसची बातच न्यारी. रंग, सुगंध आणि खास चवीमुळे फळांचा हा राजा नेहमीच ‘भाव’ खातो. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुरुवातीला हापूसची आवक कमी झाली. पाच डझन आंबे असलेल्या पेटीचा भाव साडेतीन हजार रुपये इतका होता. आर्थिक मंदीची लाट आणि हापूसचा चढा भाव यामुळे सुरुवातीला अपेक्षित असा उठाव नव्हता, परंतु आता देवगड, रत्नागिरीतून हापूसच्या रोज 80 हजार पेटय़ा आणि बदामी, लालबाग, तोतापुरी आणि कर्नाटक हापूस या आंब्यांच्या 60 हजार पेटय़ा अशी घसघशीत आवक वाशीच्या बाजार समितीत होऊ लागली आहे. त्यामुळे आंब्यांचे भाव गडगडले आहेत. त्यामुळे रत्नागिरीच्या सहा डझनांची हापूस पेटी अवघ्या 600 रुपयांत मिळत असल्याने डझनाचा भाव शंभर रुपयांवर आला आहे. म्हणजेच हापूसच्या एका आंब्याची किंमत अवघी 8 रुपये 33 पैसे इतकी आहे. त्यामुळे सर्वसामान्य खवय्यांची चंगळ झाली आहे. कर्नाटक हापूस तर थेट 30 रुपये किलोने विकला जात आहे.
देवगडचा हंगाम दहा दिवसांत आटोपणार
फेब्रुवारी महिन्यात सुरू झालेला देवगड हापूसचा हंगाम येत्या 20 मेच्या आसपास आटोपणार आहे. त्यानंतर पुढच्या दहा दिवसांत रत्नागिरी हापूसच्या हंगामाचाही शेवट होईल. दक्षिणेतील कर्नाटक हापूसचा हंगाम मात्र आणखी महिनाभर सुरू राहील. कोकण हापूसचा हंगाम संपला की नंतर गुजरात आणि जुन्नर हापूसचा हंगाम सुरू होणार असल्याची माहिती फळ मार्केटचे माजी संचालक संजय पानसरे यांनी दिली.
श्री देव कुणकेश्वरचरणी पाच हजार आंब्यांची आरास
‘कोकणची काशी’ म्हणून जगभरात ख्याती असलेल्या श्री देव कुणकेश्वर मंदिरात पर्यटन महोत्सवाचे औचित्य साधून कुणकेश्वरचरणी पाच हजार आंब्यांची आरास करण्यात आली आहे. ‘आंबा बागायतदारांवर येणारे संकट, नैसर्गिक आपत्ती, हवामानातील बदल यावर मात करून आंब्याचे चांगले पीक येऊ दे’ असे गाऱहाणे श्रींच्या चरणी घालून ही अनोखी पूजा बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.


































































