अखेर मुहुर्त सापडला, 17 नोव्हेंबरपासून सुरू होणार नवी मुंबई मेट्रो

गेल्या पाच महिन्यांपासून उद्घाटनामुळे रखडलेल्या नवी मुंबई मेट्रोला अखेर मुहुर्त सापडला. औपचारिक लोकार्पण सोहळा न करता ही मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. शुक्रवारी 17 नोव्हेंबर पासून नवी मुंबईतील बेलापूर ते पेंधर दरम्यान मेट्रोसेवा सुरू करण्यात येणार आहे. यामुळे नवी मुंबईकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

“बहुप्रतिक्षित नवी मुंबई मेट्रो 17 नोव्हेंबर 2023 पासून नवी मुंबईकरांच्या भेटीला येत आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये. यासाठी औपचारिक उद्घाटनाची वाट न बघता तातडीने मेट्रो सेवा सुरू करण्याचे निर्देश सिडकोला दिले होते. त्यानुसार 17 नोव्हेंबर पासून मेट्रो सेवेला प्रारंभ होत आहे”, असे सिडकोचे संचालक अनिल डिग्गीकर यांनी सांगितले.

ही मेट्रो सेवा दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी पेंधर ते बेलापूर टर्मिनल आणि बेलापूर टर्मिनल ते पेंधर दरम्यान दुपारी 3 वाजता सुरू होऊन शेवटची फेरी ही रात्री 10 वाजता असणार आहे. तर दिनांक 18 नोव्हेंबर 2023 पासून पेंधर ते बेलापूर टर्मिनल आणि बेलापूर टर्मिनल ते पेंधर दरम्यान सकाळी 6 वाजता पहिली मेट्रो धावणार असून दोन्ही बाजूंकडून मेट्रोची शेवटची फेरी ही रात्री 10 वाजता होणार आहे.

सदर मार्ग क्र. 1 वर दर 15 मिनिटांच्या अंतराने मेट्रो धावणार आहे. काही तांत्रिक कारणामुळे सदर मेट्रो मार्गावरील आरबीआय कॉलनी, स्थानक क्र. 2 वर काही दिवस मेट्रो थांबणार नाही याची नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी. या मार्गावर धावणाऱ्या मेट्रोच्या तिकीटाचे दर हे अंतरानुसार पुढीलप्रमाणे असणार आहेत 0 ते 2 किमीच्या टप्प्याकरिता रु. 10, 2 ते 4 किमीकरिता रु. 15, 4ते 6 किमीकरिता रु. 20, 6 ते 8 किमीकरिता रु. 25, ८ ते 10 किमीकरिता रु. 30 आणि 10 किमीपुढील अंतराकरिता रु. 40.