
सामना प्रतिनिधी। नवी मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसचे वादग्रस्त नगरसेवक विशाल डोळस हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱयात सापडले आहेत. सीबीएसई शाळेतील प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत संपलेली असताना डोळस यांनी काही विद्यार्थ्यांचे अर्ज भरुन घेण्यासाठी शिक्षण विभागावर प्रचंड दबाव आणला. मात्र शिक्षण अधिकाऱयांनी नकार दिल्यानंतर त्यांनी कॅबिनमध्ये धिंगाणा घालून टेबलवरील फायली फेकून दिल्या. वाशी येथील महापालिका रुग्णालयात डोळस यांनी केलेली गुंडगिरी चर्चेत असतानाच पुन्हा हा प्रकार घडल्यामुळे प्रशासकीय वर्तुळात राष्ट्रवादीच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचंड विरोध असतानाही महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी विशेष पुढाकार घेऊन कोपरखैरणे येथील सेक्टर 11 आणि नेरुळ, सीवूड येथील सेक्टर 50 मध्ये सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू केल्या. या शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 8 जानेवारी रोजी सुरू करण्यात आली. शेवटची मुदत 31 जानेवारी ही होती. सदर अर्ज प्रक्रियेला पालकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. मात्र मुदत संपल्यानंतर राष्ट्रवादीचे नगरसेवक विशाल डोळस शुक्रवारी काही पालकांना घेऊन शिक्षण अधिकारी संदीप संगवे यांच्या दालनात आले आणि प्रवेश अर्जाची मुदत वाढविण्यासाठी दबाव आणू लागले. मात्र ही मुदत वाढविण्याचे अधिकार आयुक्तांना आहेत, त्यांच्या परवानगीशिवाय काहीच करता येणार नाही, असे उत्तर संगवे यांनी दिल्यानंतर डोळस यांचा पारा चढला. राग अनावर झाल्याने त्यांनी संगवे यांच्या टेबलवरील सर्व फायली फेकून दिल्या.
उठताना फायली पडल्या
ज्या पालकांना सीबीएसई शाळेतील प्रवेशाचे अर्ज भरता आले नव्हते, त्यांना घेऊन मी दोन दिवस शिक्षण अधिकाऱयांच्या दालनात जात होतो. काल त्यांच्याबरोबर चर्चा सुरू असताना मी खुर्चीतून उठत असताना टेबलवरील फायलींना हात लागला आणि काही फायली खाली पडल्या, अशी प्रतिक्रिया विशाल डोळस यांनी व्यक्त केली आहे.

































































