‘पार्किंगकोंडी’तून नवी मुंबईकरांची सुटका, महिनाभरात माहिती देण्याचे आयुक्तांचे अधिकाऱयांना आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

सिडकोने वसवलेले सुनियोजित शहर नवी मुंबई हे सध्या वाहनांचे पार्किंग यार्ड झाले आहे. या गाडय़ांच्या कोंडवाडय़ातून शहराची सुटका करण्यासाठी पुढील 15 वर्षांचा विचार करून पार्किंग आराखडा तयार करण्याचे काम महापालिका प्रशासनाने सुरू केले आहे. त्यासाठी आवश्यक असलेली माहिती एका महिन्याच्या आत जमा करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी संबंधित अधिकाऱयांना दिले आहेत.

सिडकोने पुढील 50 वर्षांचा विचार करून जरी नवी मुंबई शहराची रचना केली असली तरी वाहनांच्या पार्किंगबाबत सिडकोचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. वाशी, बेलापूर, कोपरखैरणे आणि ऐरोलीमध्ये वाहनचालकांना पार्किंगसाठी दोन–दोन किलोमीटरच्या चकरा  माराव्या लागतात. शेकडो इमारतींमध्ये पार्किंग नसल्यामुळे या इमारतींमधील गाडय़ा रस्त्यावरच उभ्या राहतात. रात्री 9 ते 10 च्या नंतर रहिवाशांना रस्त्यावर पार्किंग करण्यासाठीही जागेचा शोध घ्यावा लागतो.

पामबीचलगत ठिकठिकाणी तयार करण्यात आलेल्या सर्व्हिस रोडवरही आता नागरिक गाडय़ांची पार्किंग करू लागले आहेत. याच वेगाने जर गाडय़ांची संख्या वाढली तर पुढील तीन–चार वर्षांत पामबिच मार्गावरही रात्री पार्किंगसाठी वाहने उभी केली जातील. शहरातील पार्किंगची समस्या गंभीर असल्याचे निदर्शनात आल्यानंतर महापालिका आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांनी तातडीची बैठक बोलावली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त महावीर पेंढारी, अमोल यादव, पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे, शहर अभियंता सुरेंद्र पाटील, नगर रचनाकार सतीश उगले, उपायुक्त दादासाहेब चाबूकस्वार आदी उपस्थित होते.

एका क्लिकवर मिळणार माहिती

 

शहरातील इमारती आणि त्यांच्याकडे असलेली पार्किंग, पार्किंगचे भूखंड, विनामूल्य पार्किंग आणि पे–पार्किंग यांच्या जागांची निश्चिती याबाबतची माहिती महिनाभरात जमा करण्याचे आदेश प्रशासनाला कोणत्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे, याची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देण्याचे पालिकेचे प्रयत्न आहेत, असे महापालिका आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांनी सांगितले.