नवी मुंबईत शिवसेनेचा मदतीचा ओघ; वाशी, सानपाड्यात अन्नधान्य, भाजीपाला, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

2176

कोरोनामुळे बांधकाम साइट, विविध ठिकाणी सुरू असलेली कंत्राटी कामे आणि मोलमजुरीची कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. त्यामुळे हातावर पोट असणारे नाका कामगार अडचणीत आले आहेत. शहरात सर्वत्र लॉकडॉऊन असल्यामुळे नागरिक घरामध्ये अडकून पडले आहेत. त्यांच्या मदतीसाठी शिवसेना धावून आली आहे. वाशी आणि सानपाडा परिसरात शिवसेनेच्या माध्यमातून अन्नधान्य, भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरू करण्यात आले आहे.

नवी मुंबई शहरात सुमारे २५ ठिकाणी कामगारांचे नाके आहेत. या नाक्यांवर वर्षभर हजारो मजुरांची मोठी गर्दी असते. गेल्या १५ दिवसांपूर्वी सर्वच नाके सकाळी ११ नंतर रिकामी व्हायची. सर्व मजुरांच्या हाताला काम मिळायचे. मात्र सध्या कोरोना विषाणूचा वाढत चाललेला फैलाव कमी करण्यासाठी गर्दी टाळण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यामुळे उद्योग ठप्प झाल्याने नाका कामगार आणि त्यांचे कुटुंब अडचणीत आले आहेत. त्यांची अडचण लक्षात घेऊन शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी वाशी येथील सेक्टर १५ मध्ये असलेल्या नाक्यावरील सुमारे एक हजार नाका कामगारांना आठवड्यापासून धान्याचे वाटप सुरू केले आहे. या भागातील सर्व रहिवाशांना पाटकर यांच्या माध्यमातून दररोज भाजीपाल्याचे मोफत वाटप केले जात आहे. समाजसेविका वैशाली पाटकर, विभागप्रमुख चंद्रकांत जाधव यांच्यासह स्थानिक पदाधिकारी शिस्तबध्द पध्दतीने प्रत्येक इमारतीजवळ जाऊन भाजीपाला आणि अन्य वस्तूंचे वाटप करीत आहेत.

सानपाडा परिसरातील गोरगरिबांच्या मदतीला स्थानिक शिवसेना नगरसेवक सोमनाथ वास्कर आणि कोमल वास्कर हे धावून आले आहेत. हातावर पोट असलेल्या मजूरांना त्यांनी अन्नधान्य आणि किराणा मालाचे वाटप सुरु केले आहे. याच भागात उपजिल्हाप्रमुख मिलिंद सूर्यराव यांच्या माध्यमातून स्थानिक रहिवाशांना भाजीपाला घरपोच दिला जात आहे. नेरुळमध्ये शहरप्रमुख विजय माने आणि नगरसेवक काशीनाथ पवार यांनी बेघर नागरिकांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या