भाज्या हिंदुस्थानी… कांदा तुर्कस्तानी, आवक वाढल्यामुळे दर घटले

661

‘मेरा जुता है जपानी.. ये पतलून हिंदुस्थानी.. सर पे लाल टोपी पेहनी.. फिर भी दिल है हिंदुस्थानी..’ याच चालीवर आता कांद्याचेदेखील गाणे गुणगुणावे लागेल. ‘आया कांदा तुर्कस्तानी.. खवय्या हिंदुस्थानी’ असे म्हणत या अनोख्या कांद्याची चव चाखता येणार आहे. किचनमधील भाज्यांच्या फोडणीतदेखील हाच कांदा वापरण्यास सुरुवात झाली असून एपीएमसी मार्केटमध्ये 20 टन तुर्कस्तानी कांदा आज दाखल झाला. इतर कांद्यांचीही आवक वाढू लागल्याने किलोचा भाव 70 रुपयांवर आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून कांद्याने शंभरी पार केल्याने हा कांदा सर्वसामान्यांना अक्षरशः रडवत होता. गगनाला भिडलेले भाव नियंत्रित करण्यासाठी व्यापाऱयांनी इजिप्त आणि हॉलंडपाठोपाठ आता तुर्कस्तानमधून कांदा आयात केला आहे. जेएनपीटी बंदरात सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर तुर्कस्तानी कांद्याचा पहिला कंटेनर आज एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झाला. या पाहुण्या कांद्याला 70 रुपये किलोचा दर मिळाला. दरम्यान देशी गुलाबी कांद्याची आवक आज मार्केटमध्ये वाढल्यामुळे भाव थोडे कमी झाले. नंबर एकचा गुलाबी कांदा 60 ते 75 रुपये किलो या दराने विकला गेला.

परतीच्या पावसाचा फटका

परतीच्या पावसाचा फटका बसल्यामुळे गुलाबी कांद्याचे अपेक्षीत उत्पन्न निघाले नाही. त्यामुळे कांद्याने शंभरी पार केली. जुना कांदा संपल्यामुळे आता फक्त बाजारात नवीन कांदाच येत असल्याने दर कमी झाले आहेत. एक नंबरचा कांदा 60 ते 70 रुपये, दोन नंबरचा कांदा 35 ते 40 रुपये आणि तीन नंबरचा कांदा 20 रुपये किलोने विकला गेला असल्याचे व्यापारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.

  • गावरान कांद्याची आवक एपीएमसी मार्केटमध्ये आता बंद झाली आहे. नवीन गुलाबी कांद्याची आवक वाढत असली तरी तो 700 टनाच्या आसपास आहे.
  • आज नवीन एक नंबरचा कांदा 60 ते 75 रुपये किलो या दराने विकला गेला तर दोन नंबरच्या कांद्याला 35 ते 45 रुपये किलो असा दर मिळाला. तीन नंबर म्हणून ओळखल्या जाणाऱया चिंगळी कांद्याची क्रिकी 20 रुपये किलो या दराने झाली.
  • शंभरी पार केल्यानंतर ग्राहकांना रडविणाऱया कांद्याने शेतकरी मालामाल झाला नाही. उलट तो आर्थिक संकटात ढकलला गेला आहे. परतीच्या पावसाचा जेरदार फटका कांद्याच्या पिकाला बसला. त्यामुळे एका एकरात दहा टन निघणाऱया कांद्याचा उतार आता थेट दहा गोण्यांवर आला.

इजिप्त आणि हॉलंडचीही चव चाखली

मध्यंतरी कांद्याने शंभरी पार केल्यानंतर परदेशातून 11 हजार मेट्रिक टन कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार व्यापाऱयांनी इजिप्त आणि हॉलंडमधून कांदा आयात केला.या कांद्याचीही चव खवय्यांनी चाखल्यानंतर इजिप्तचा कांदा जेवण्याच्या ताटात आला आहे. सुरुवातीला आयात झालेल्या इजिप्तच्या कांद्याला एपीएमसीमध्ये फक्त 20 रुपये किलोचा दर मिळाला होता. तुर्कस्तानच्या कांद्याला मात्र आज 70 रुपये किलोचा दर मिळाला. हा कांदा हिंदुस्थानी कांद्याप्रमाणेच आकाराला आहे. त्यामुळे ग्राहकांचीही त्याला पसंती मिळत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या