जो 500 कोटींची सूटकेस देतो, तोच मुख्यमंत्री बनतो; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचे मोठे विधान

काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्या पत्नी नवज्योतकौर सिद्धू यांनी पंजाबच्या राजकारणाबाबत मोठे विधान केले आहे. नवज्योतकौर यांनी शनिवारी चंदीगडमध्ये राज्यपाल गुलाब चंद कटारिया यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेसह महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. पंजाबमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून सिद्धू यांच्या नावाची घोषणा केली तरच ते पुन्हा सक्रिय राजकारणात उतरतील, असे त्या म्हणाल्या.

पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना नवज्योतकौर सिद्धू म्हणाल्या की, काँग्रेसने सिद्धूला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून नियुक्त केले तरच ते सक्रिय होतील, अन्यथा ते टीव्ही चॅनलवरील कार्यक्रमातून भरपूर पैसे कमवत आहेत. सिद्धू काँग्रेसमध्ये असून प्रियांका गांधींसोबत काम करत आहेत. सध्या काँग्रेसमधील पाच नेते आधीच मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत आणि ते सिद्धू यांना पुढे जाऊ देणार नाहीत. ते काँग्रेस पक्षाला पराभवाकडे नेत आहेत. हे हायकमांडला हे समजले तर चांगलच आहे, असे नवज्योत कौर सिद्धू म्हणाल्या.

मुख्यमंत्रीपदाची निवड पैशांच्या जोरावर केली जात आहे. आमच्याक़डे कधी पक्षाने पैसे मागितले नाही, पण जो 500 कोटींची सूटकेस देतो, तोच मुख्यमंत्री बनतो. आमच्याकडे 500 कोटी रुपये नाहीत, जे कोणत्याही पक्षाला देऊन मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसता येईल, असे मोठे विधान यावेळी त्यांनी केले.

नवज्योत कौर सिद्धू यांनी दावा केला की, जर सिद्धू यांच्याकडे जबाबदारी दिली, तर ते पंजाबचे ‘गोल्डन स्टेट’मध्ये रूपांतरित करू शकतात. त्यांच्याकडे पैसे नसले तरी एक चांगला बदल आणण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे, असे त्यांनी सांगितले.