पंजाब काँग्रेसमधील अस्वस्थता ‘जैसे थे’, सिद्धूचा पुन्हा यॉर्कर; सोनियांना लिहिले पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाब काँग्रेसमध्ये अस्वस्थता कायम आहे. पॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायला लावणारे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी आता विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांच्यावर निशाणा साधत पक्षाध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहिले आहे. पत्रात पंजाबच्या 13 मुद्दय़ांकडे लक्ष वेधले आहे. विशेष म्हणजे पक्षाच्या प्रोटोकॉलकडे दुर्लक्ष करीत त्यांनी हे पत्र सोशल मीडियात पोस्ट केले आहे.

दोन-तीन दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांनी सिद्धूंची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला होता. दोघांमध्ये यशस्वी चर्चा होऊनही आता थेट सोनिया गांधींना पत्र लिहून सिद्धू यांनी नव्या वादाला पह्डणी दिली आहे. या पत्रात त्यांनी चन्नींना मुख्यमंत्री बनवण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला आहे. पंजाबमध्ये काँग्रेसला शेवटची संधी आहे. त्यामुळे सरकारला 13 मुद्दय़ांवर काम करण्याचे निर्देश द्या, अशी विनंती सोनिया यांना केली आहे. तसेच त्यांच्याशी चर्चेसाठी वेळ मागितली आहे. त्यांचे पत्र म्हणजे हायकमांडच्या माध्यमातून चन्नी सरकारवर दबाव आणण्याचा नवा फॉर्म्युला मानला जात आहे.

पत्रातील प्रमुख मुद्दे

2015 मध्ये श्री गुरु ग्रंथ साहिबचा झालेला अपमान व त्यानंतरच्या गोळीबार प्रकरणात न्याय व्हावा, ड्रग्ज तस्करांना अटक करावी, कृषी कायदे पंजाबमध्ये लागू करणार नसल्याची घोषणा व्हावी, नागरिकांना स्वस्त किंवा 300 युनिट मोफत वीज द्यावी, चन्नींच्या रूपात दलित मुख्यमंत्री बनले, परंतु मंत्रिमंडळात दलित समाजाला समान प्रतिनिधित्व मिळाले नाही. दारूच्या व्यवसायावर एकाधिकार, केबलमाफिया संपुष्टात आणणे आदी मुद्दे पत्रात मांडले आहेत.