
स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतलेले ज्येष्ठ समाजवादी नेते व पालघरचे माजी आमदार नवनीतभाई शाह यांचे आज रात्री अल्प आजाराने निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने समाजवादी विचारांची बांधिलकी जपणारा व्रतस्थ नेता हरपला आहे .
नवनीतभाई शाह यांची तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात दाखल केले होते, मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे दोन मुली, मुलगा व नातवंडे असा परिवार आहे. उद्या दुपारी दोन वाजता शाह यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात आयुष्यभर काम केलेल्या नवनीत शाह यांचा जन्म 8 डिसेंबर 1923 रोजी गुजरातमधील बलसाड येथे झाला, मात्र व्यवसायाच्या निमित्ताने त्यांचे कुटुंब पालघरमध्ये आले. सामाजिक काम करीत असतानाच त्यांनी 1952 साली पालघरच्या पहिल्या सरपंचपदाची निवडणूक लढवली व ते विजयी झाले. 1957 मध्ये ते आमदारही झाले. पालघरच्या विकासात शाह यांचा मोठा वाटा होता.






























































