1999च्या लाहोर कराराचं पाकिस्तानकडून उल्लंघन, नवाज शरीफ यांची कबुली

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मंगळवारी एक मोठी कबुली दिली आहे. साल 1999मध्ये हिंदुस्थानचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात झालेल्या लाहोर कराराचं उल्लंघन पाकिस्तानने केल्याचं शरीफ म्हणाले आहेत.

त्या वेळी सैन्याचे प्रमुख जनरल परवेज मुशर्रफ यांनी कारगिल युद्ध छेडत या कराराचं उल्लंघन केलं होतं. 28 मे 1998मध्ये पाकिस्तानने पाच अणुचाचण्या केल्या. त्यानंतर वाजपेयी इथे आले आणि त्यांनी लाहौर करार केला. पण आपण त्या कराराचं उल्लंघन केलं, ही आमची चूक होती, असं नवाज शरीफ म्हणाले आहेत. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी पाकिस्तानला अणुचाचणी रोखण्यासाठी 5 अब्ज अमेरिकन डॉलर देऊ केले होते. पण मी नकार दिला होता, असंही शरीफ म्हणाले आहेत.

मंगळवारी पाकिस्तानातील सत्ताधारी असलेल्या पाकिस्तन मुस्लीम लीग-नवाज या पक्षाच्या अध्यक्षपदावर शरीफ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पनामा पेपर्स प्रकरणात तेथील सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर पदच्युत झालेले शरीफ आता पुन्हा सहा वर्षांनी पुन्हा याच पदावर विराजमान झाले आहेत. पक्षाचं अध्यक्षपद पुन्हा स्वीकारल्यानंतर झालेल्या बैठकीत ही जाहीर कबुली शरीफ यांनी दिली आहे.

नवाज शरीफ आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी लाहौर येथील एका शिखर संमेलनानंतर 21 फेब्रुवारी 1999मध्ये एका करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. दोन्ही देशांनी शांतता आणि स्थैर्य या मुद्द्यांवर भर देऊन चांगल्या आणि मजबूत नात्याविषयी सूतोवाच केलं होतं. पण, अवघ्या काही महिन्यांत जम्मू-कश्मीरच्या कारगिर जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्याने घुसखोरी केल्याने कारगिल युद्ध सुरू झालं होतं.