ड्रग्ज कारवाईची माहिती देण्यास एनसीबीचा नकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)ने माहिती अधिकार अर्जात गेल्या तीन वर्षांत केलेल्या कारवाईची माहिती देण्यास नकार दिला आहे. एनसीबीने माहिती अधिकार कायदा अधिनियम 2005 चे कलम 24 चा आधार घेत माहिती देणे नाकारली आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत एनसीबी येते. एनसीबी मुंबई युनिटने गेल्या काही महिन्यात मुंबई, ठाणे, नांदेड, कल्याण, पुणे, नवी मुंबई, मीरा रोड व नालासोपारा येथे कारवाई करून अनेक ड्रग्जमाफियांना जेरबंद केले होते. कारवाई करून एनसीबीने कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहे. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एनसीबीकडे माहिती अधिकार कायद्याखाली दोन अर्ज करून गेल्या तीन वर्षांत केलेल्या कारवाईची आणि विल्हेवाट लावलेल्या अमली पदार्थाची माहिती मागवली, मात्र एनसीबीने दोन्ही अर्जांना कलम 24 चा आधार घेत माहिती देण्यास नकार दिला आहे.

कलम 24 नुसार केंद्र सरकारने स्थापन केलेल्या संस्था किंवा अशा संघटना त्या सरकारला दिलेली कोणतीही माहिती दुसऱ्या अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणाना या कायद्यात समाविष्ट असलेली गोष्ट लागू होणार नाही. एनसीबी केलेल्या कारवाईची माहिती देत असते, मात्र माहिती अधिकारात का माहिती देत नाहीत? मुंबई पोलीस सहजपणे माहिती देतात, पण एनसीबी का माहिती देण्यास टाळाटाळ करते, असे गलगली यांचे म्हणणे आहे.