
महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये भाजपच्या नेत्या चित्रा वाघ या पीडितेच्या मानसिकतेचा गैरफायदा घेऊन तिला भावनिकदृष्टय़ा ब्लॅकमेल करतात. तसेच आरोपींकडून खंडणीदेखील वसूल करतात, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आशा मिरगे यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत केला.
चित्रा वाघ या महिला अत्याचाराच्या निवडक प्रकरणांमध्येच लक्ष घालतात. महिला अत्याचाराच्या अनेक प्रकरणांमध्ये प्रतिष्ठत आरोपी सापडल्यास त्यांच्याकडून खंडणी वसूल केली आहे. त्यांची ही जुनी मोड्स ऑपरेंडी आहे. स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी महिला अत्याचाराच्या प्रकरणाचा वापर करणाऱया चित्रा वाघ यांच्याकर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आशा मिरगे यांनी केली.
भाजपमधील दोन-तीन अशा स्त्रिया माहिती आहेत की, ज्यांना स्त्री म्हणणे हाच महिलांचा अपमान आहे. महिला अत्याचाराचा कोणीही गैरवापर करू नये. पद, प्रतिष्ठा आणि स्वतःला मोठे करण्यासाठी असे प्रकार करणाऱया लोकांवर कठोर कारकाई होणे गरजेचे आहे, असे या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या विद्या चव्हाण यांनी म्हटले आहे.
माध्यमांची दिशाभूल
संजय राठोड प्रकरणात चित्रा वाघ यांना मुलीने इमारतीवरून उडी मारल्याचे कसे माहिती झाले? या प्रकरणात पीडित मुलीची ओळख उघड करायची नाही, असा नियम असूनही चित्रा वाघ वारंवार पत्रकार परिषदेमध्ये पीडितेचे नाव घेत होत्या. सफाईदारपणे त्यांनी प्रसारमाध्यमांना या सगळ्या प्रकरणांत गुंतवून ठेवले. रघुनाथ कुचिक प्रकरणातही त्या सातत्याने माध्यमांची दिशाभूल करत असल्याचे आशा मिरगे यांनी सांगितले.
























































