
एकीकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, जिह्यातील दहा आमदार, खासदार, अशा सत्तेच्या जोरावर कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक लढणाऱया महायुतीला 45 जागांवर बहुमत मिळाले असले तरी त्या तुलनेत विरोधात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकहाती 35 जागा जिंकल्याने महायुतीच्या नेत्यांना त्याचे चांगलेच पोटशूळ उठल्याचे दिसत आहे.
यापूर्वी सतेज पाटील यांनी निवडणूक लढवण्यापेक्षा महायुतीला पाठिंबा देण्याचे वक्तव्य केले होते. आता हा विजय म्हणजे महान पराक्रम समजण्याचे कारण नाही, असा संताप वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्याविषयी बोलून दाखविला.
महायुती होण्यापूर्वी कोल्हापूर महापालिकेवर सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची आणि मंत्री मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची सत्ता होती. राज्यातील सत्ताबदल आणि ईडी कारवाईच्या पार्श्वभूमीवर मुश्रीफ हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीबरोबर महायुतीत सहभागी झाले; पण सतेज पाटील हे महाविकास आघाडीत राहिले. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मुश्रीफ यांची भूमिका स्वतःच्या राजकीय सोयीनुसार बदलली. नगरपालिका निवडणुकीत तर कट्टर विरोधकाशी केलेली अनपेक्षित हातमिळवणीही चर्चेचा विषय बनली.आता महानगरपालिका निवडणुकीत महायुतीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून मुश्रीफ यांनी 15 जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यातील केवळ चारच विजयी झाले. याची खंत न बाळगता उलट याचा राग त्यांनी सतेज पाटील यांच्यावरच काढण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.
महायुतीच्या विजयी नगरसेवकांचा आज सन्मान करण्यात आला.यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांनाच टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. हा विजय म्हणजे महान पराक्रम समजण्याचं कारण नसल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला. शहरात त्यांचेच संघटन असल्याने सतेज पाटील यांना इतक्या जागा मिळाल्याचे सांगताना महायुतीत समन्वयाचा अभाव असल्याची कबुलीही मुश्रीफ यांनी दिली.
दरम्यान, नवनियुक्त नगरसेवकांना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर यांनी संघटित राहण्याचे धडे दिले.
महापालिकेत राष्ट्रवादीची संख्या एकेरी
कधीकाळी काँग्रेससोबत राष्ट्रवादी काँग्रेस महापालिकेच्या सत्तेतील कारभारी होते. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीने महायुतीत 15 जागा लढवल्या. यातील चार जागांवर विजय मिळाला; पण महापालिकेच्या सत्तेत पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे संख्याबळ एकेरी झाले आहे. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापतीपद भूषविलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक राष्ट्रवादीला राम राम करून भाजप आणि शिवसेनेत दाखल झाले आहेत. याचाच फटका या निवडणुकीत राष्ट्रवादीला बसल्याचे चित्र आहे.



























































