
अभिनेता सुशांतसिंह राजपूतने आत्महत्याच केल्याचे एम्सच्या अहवालातून स्पष्ट झाल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर हल्लाबोल केला. सुशांतसिंहची हत्या झाल्याचा दावा करीत महाराष्ट्राला बदनाम कराणाऱ्या भाजपचा चेहरा उघडा पडला आहे. महाराष्ट्र व पोलिसांची बदनामी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काँग्रेस तसेच राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे.
सुशांतसिंहप्रकरणी आलेल्या एम्सच्या अहवालात सुशांतच्या हत्येचा दावा फेटाळण्यात आला आहे. या अहवालानंतर महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीनेही यावरून भाजपवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षड्यंत्र रचणाऱ्या सूत्रधाराचा शोध लावण्यासाठी आता आघाडी सरकारने एसआयटी स्थापन करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. तर आघाडी सरकारची आणि मुंबई पोलिसांची बदनामी करणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.
सुशांतसिंह प्रकरणाचा बिहार निवडणुकीत वापर करून आपली राजकीय पोळी भाजण्याचे एक मोठे षड्यंत्र रचण्यात आले होते. याचबरोबर महाराष्ट्र विकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी महाराष्ट्राला बदनाम करण्याचे कारस्थान भाजपने रचले होते. बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनीही या बदनामीच्या कटात महत्त्वाची भूमिका वठवली होती. रातोरात शेकडो फेक सोशल मीडिया अकाऊंट उघडून त्याच्या माध्यमातून महाराष्ट्राची, मुंबई पोलिसांची यथेच्छ बदनामी करण्यात आली. या सर्वांचे पितळ उघडे पडल्याचे सावंत यांनी म्हटले आहे.
तोंड न लपवता माफी मागा – रोहित पवार
बिहार निवडणुकीसाठी सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूचे भांडवल करू पाहणाऱ्या नेत्यांच्या मनसुब्यांवर एम्सच्या अहवालाने पाणी फेरल्याने मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे. आता ज्यांनी महाराष्ट्राची व आपल्या पोलिसांची बदनामी केली त्या सर्वांनी तोंड न लपवता जाहीर माफी मागावी, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली.



























































