‘मेगाभरती’बाबत शरद पवार यांचे मोठे विधान, वाचा सविस्तर…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sharad-pawar-new

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी मनमोकळेपणाने पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दोन्ही पक्ष प्रत्येकी 125 जागांवर लढणार आणि मित्रपक्षांना 38 जागा सोडणार असल्याचे पवार यांनी म्हटले. यावेळी त्यांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांबाबत आणि सध्या सुरू असलेल्या मेगाभरतीबाबतही पवारांनी आपले मत मांडले.

पक्ष सोडून जाणाऱ्यांबाबत प्रश्न विचारला असता पवार म्हणाले की, ज्या पक्षात या व्यक्ती जातात त्या पक्षाला त्यांच्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आहे. काही लोकांना असे वाटते की केंद्रातील सत्ता ज्यांच्या हातात आहे, त्यांची राज्यामध्येही सत्ता येईल, त्यामुळे पक्षांतर सुरू असावे. यापेक्षा वेगळी मानसिकता दिसत नाही. तसेच लोकं सोडून जाताना पक्षाबाबत आणि माझ्याबाबत आदर आहे, असे वाचल्याचेही ते म्हणाले.

मेगाभरतीबाबत पवारांना विचारेल असता ते म्हणाले की, याआधीही अशी मेगाभरती झाली आहे. 1957 साली काँग्रेसचा पराभव झाला तेव्हा मेगाभरती झाली होती, परंतु त्यानंतर 1962 साली काँग्रेसचे सरकार पुन्हा आले. परंतु त्या वेळचा पक्षांतराचा वेग आणि आताचा वेग व प्रमाण अधिक आहे, असेही पवार म्हणाले. पवार पुढे म्हणाले की, पक्ष सोडून गेलेले अजूनही भेटतात. अनेक ठिकाणी माझ्या सहकाऱ्यांनी काही पत्र दाखवली. एखाद्या संस्थेची चौकशी करण्याचे पत्र, ईडीची नोटीस यामुळे भरती सुरू आहे, असे ऐकिवात असल्याचे ते म्हणाले. तसेच या मेगाभरतीचा पुढील राजकारणावर काही परिणाम होईल असे वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले. लोकांना याबाबत कळत असून यामुळे ते फार समाधानी नाहीत. मतपेटीच्या माध्यमातून ते मनात काय आहे ते दाखवून देतील, असे ते म्हणाले.

तरुणांना संधी
विधानसभा निवडणुकीसाठी तरुणांची फळी मैदानात उतरवणार असल्याचे पवार म्हणाले. तरुणांना संधी देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. तसेच नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे, संभाजीनगर, मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची संयुक्त सभा घेण्याचा प्रयत्न असून याची संपूर्ण आखणी सुरू असल्याचे ते म्हणाले.