शरद पवारांकडून चपराक; फक्त राज्यातच का, देशात निवडणुका घ्या!

811
sharad-pawar-new1

मध्यावधी निवडणुका होण्याची स्वप्ने बघणाऱया भाजपला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार टोला लगावला. मध्यावधी निवडणुका या राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशात घ्या. राज्याची विधानसभा निवडणूक कशाला घेता? संपूर्ण देशाची लोकसभा निवडणूक घ्या, अशा शब्दांत शरद पवार यांनी भाजपला सुनावले आहे.

एल्गार परिषद आणि कोरेगाव-भीमा प्रकरणाच्या तपासावरून सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपकडून मध्यावधी निवडणुकांच्या केल्या जात असलेल्या वक्तव्याबाबत शरद पवार यांना विचारले असता ते म्हणाले, मध्यावधी निवडणुका या फक्त देशाच्या होतात. एखाद्या लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका घ्यायच्या असल्या तर ते भाजपच्याच हातात आहे. भाजपने केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेऊन पुन्हा निवडणूक घ्यावी.

‘महाविकास आघाडी सरकार पडेल असा दावा अनेकदा भाजपकडून केला जातो यासंदर्भात तुमचे मत काय?,’ असा सवाल करण्यात आला असता शरद पवार म्हणाले, ‘अशा बाबी मी गांभीर्याने घेत नाही. विरोधक एकदा हे बोलतात, दुसऱया दिवशी ते बोलतात. राज्याच्या भल्यासाठी जे शक्य आहे ते करत राहणे हा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱयांचा विचार आहे.’

भीमा-कोरेगाव आणि एल्गारप्रकरणी पोलिसांचा गैरवापर

भीमा-कोरेगाव आणि एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे दिला तो केंद्राचा अधिकार आहे; परंतु भीमा-कोरेगाव किंवा एल्गार याची चौकशी व्हावी ही आमची मागणी नाही. तर पोलीस दलाचा ज्या पद्धतीने गैरवापर झाला आहे त्याची चौकशी व्हायला हवी. या प्रकरणाचा चौकशी करण्याचा अधिकार राज्य सरकारलाही आहे. यामध्ये पुणे पोलिसांनी जो तपास केला त्यामुळे महाराष्ट्र पोलिस दलाच्या लौकिकाला धक्का बसला आहे. त्यामुळे या प्रकरणात सहभागी असलेल्या महाराष्ट्र पोलीस आणि पुणे पोलिसांची चौकशी करण्यात यावी अशी मागणीही शरद पवार यांनी केली आहे.

भीमा-कोरेगाव आणि एल्गारचा संबंध नाही

कोरेगाव आणि एल्गारचा संबंध नव्हाता. पुरोगामी विचाराच्या लोकांनी सहभागी होत ही एल्गार परिषद घेतली होती. त्या परिषदेत भाषणे झाली. पोलीस रिपोर्ट सादर केला गेला; पण त्याच्याशी संबंध नसलेल्या, तिथे हजर नसलेल्या लोकांवरही खटले भरण्यात आले आहेत. सुधीर ढवळे यांनी नामदेव ढसाळ यांच्या कवितेचे वाचन केले म्हणून त्यांना अटक करण्यात आली. कवितेचा आधार घेऊन दोन-दोन वर्षे तुरुंगात टाकायचे ही गोष्ट योग्य नाही. पुरावे असे तयार केले की, जामीन त्यांना मिळाला नाही. सर्वेच्च न्यायालयानेही या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. आमचीही तीच मागणी आहे. यामागे कोण आहे त्याची चौकशी व्हावी. त्यासाठी एसआयटी नेमा. चांगले अधिकारी घ्यावेत. जे काही पुरावे देण्यात आले त्यातील सत्य बाहेर येईल, असेही शरद पवार म्हणाले.

भीमा-कोरेगाव येथे अनेक वर्षे एका ठिकाणी लोक स्तंभाला अभिवादन करण्यासाठी जमतात. येथील स्थानिक ग्रामस्थ इथे येणाऱया लोकांना पाण्याची व्यवस्था करत होते. त्यावेळी कोणतीही कटुता नव्हती. मात्र आजूबाजूच्या खेडय़ात संभाजी भिडे, एकबोटे यांनी फिरून वेगळे वातावरण निर्माण केले. भीमा-कोरेगाव प्रकरणाची आयोगामार्फत चौकशी सुरू आहे. त्यामुळे वस्तुस्थिती समोर येईलच, असेही पवार म्हणाले.

त्या बैठकीची माहिती केंद्राला कशी मिळाली?

एल्गार परिषदेच्या तपास प्रकरणात राज्य सरकार लक्ष घालत असल्याचे केंद्र सरकारला कुणी कळवलं? या बैठकीला उपस्थित असलेल्या अधिकाऱयांनी हे उद्योग केले असावेत. एल्गार चौकशीप्रकरणी पुणे पोलीस, त्यांचे वरिष्ठ यांचा बघण्याचा दृष्टिकोन चिंताजनक आहे. हा महाराष्ट्र पोलिसांचा लौकिक नाही, असे शरद पवार म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या