राष्ट्रवादीवर जाहीरनामा थांबवण्याची नामुष्की,संयुक्तपणाच्या नावाखाली काँग्रेसकडून खो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादीचा जाहीरनामा तयार झाला. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे, नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ हे स्वतः जाहीरम्याचे प्रकाशन करणार हे निश्चितही झाले. जय्यत तयारी झाली असतानाच ऐनवेळी राष्ट्रवादीचा जाहीरनाम्याचा कार्यक्रमच रद्द करण्यात आला. एकीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून प्रचाराचे रान उठवले जात आहे. मात्र त्याचवेळी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संयुक्त बैठकीत मात्र काँग्रेसने राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यालाच खो घातला.

लोकसभा निवडणुकीतील प्रचारात काँग्रेसचे नेते कुठेच दिसले नाहीत. राष्ट्रवादीसह आघाडीचा प्रचार करण्यात शरद पवार यांनीच विशेष मेहनत घेतली. आजही काँग्रेसची यादी जाहीर होईल असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून सांगितले जात असताना पृथ्वीराज चव्हाण,  अशोक चव्हाण यांच्यातही ताळमेळ दिसत नाही. आज काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीत काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रवादीचाही ताळमेळ बिघडवला. एकीकडे यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये जाहिरनाम्याच्या प्रसिद्धीची तयारी सुरू होती. राष्ट्रवादीचे प्रतोद हेमंत टकले, जाहिरामा समितीच्या प्रमुख खासदार वंदना चव्हाण यांच्याकडून कुठले मुद्दे मीडियासमोर प्रकर्षाने यावेत याची चर्चाही सुरू होती. मात्र प्रवक्ते नवाब मलिक यांनी ऐनवेळी येऊन हा जाहीरनामाच गुंडाळल्याचे जाहीर केले.

राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यावर काँग्रेसची नाराजी
प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, छगन भुजबळ, तटकरे या नेत्यांसमोर काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या जाहिरनाम्याविषयी काँग्रेस नेत्यांकडून  नाराजी व्यक्त करण्यात आली. समन्वयातील आभावामुळे काँग्रेसचा जाहीरनामा तयार नसताना राष्ट्रवादी पहिल्यांदा तो जाहीर करणार म्हणून हा खो घालण्यात आल्याचे समजते. एकीकडे लोकसभेला स्वतंत्र जाहिरनामा   जाहीर केला असताना विधानसभेला मात्र स्वतंत्र जाहिरानामा कसा करता? यामुळे लोकांमध्ये गैरसमज निर्माण होईल, असे कारण करीत  राष्ट्रवादीच्या जाहिरमान्याला खीळ घालण्यात आली.