न्यायालयाने चंद्रकांत पाटील यांच्यावर सुमोटो कारवाई करावी; रा.काँग्रेसची मागणी

न्यायालयसुद्धा चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्यानुसार काम करत असेल तर लोकशाही कुठेतरी संपली असे जाहीर करा. नाहीतर चंद्रकांत पाटील यांनी न्यायालयाची माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज केली. याप्रकरणी न्यायालयाने सुमोटो (स्वतःहून दखल घेऊन) कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

पश्चिम बंगालमधील विजयाबद्दल राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ममता बॅनर्जी यांचे कौतुक केले होते. ममता बॅनर्जी झाशीच्या राणीप्रमाणे लढल्या अशा शब्दांत त्यांनी कौतुक केले. पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा एक दिवसाआड सभा घेत होते. त्यांचे आठ ते दहा मंत्री मतदारसंघात ठाण मांडून बसले होते; पण उपयोग झाला नाही, अशी टीकाही भुजबळ यांनी केली होती.

चंद्रकांत पाटील यांची धमकी

पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांना ममता बॅनर्जी यांचे कौतुक सहन झाले नाही आणि भाजपच्या नेत्यांवरील टीकाही सहन झाली नाही. छगन भुजबळांनी पंढरपूरवर प्रतिक्रिया द्यावी. कशाला पश्चिम बंगालवर बोलतात. जिथे आहात तिथे बोला, जामिनावर सुटला आहात. अजून निर्दोषत्व सिद्ध झालेले नाही. त्यामुळे फार जोरात बोलू नका, अन्यथा फार महागात पडेल,’ अशी धमकीच चंद्रकात पाटील यांनी दिली होती.

नवाब मलिक यांचा पलटवार

चंद्रकात पाटील यांच्या या धमकीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी चांगलाच समाचार घेतला.आजपर्यंत भाजपकडून एजन्सीचा दुरुपयोग करण्यात येत आहे हे सिद्ध झाले आहे. आता न्यायालयसुद्धा त्यांच्या बोलण्यावर काम करतेय का, असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे.

प्रकरण न्यायप्रविष्ट

 छगन भुजबळ यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे; परंतु चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्याचा अर्थ काय आहे, अशी विचारणाही नवाब मलिक यांनी केली. चंद्रकांत पाटील अशा पद्धतीने बोलत असतील तर न्यायालयाने सुमोटोअंतर्गत कारवाई करावी, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या