Video – मराठी भाषिकांबरोबर नसल्याचे देवेंद्र फडणवीसांनी सिद्ध केले – जयंत पाटील

महाराष्ट्रात गेली पाच वर्षे सत्तेत असताना भाजपने सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समिती, तसेच येथील मराठी भाषिकांच्या मागण्या आणि अपेक्षांकडे नेहमी दुर्लक्षच केले होते. आता भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी येथे येऊन आपण मराठी भाषिकांबरोबर नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा सिद्ध केल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मंत्री जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्र एकीकरण समिती आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे जुने संबंध आहेत. सीमाभागातील मराठी भाषिकांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या झेंडय़ाखाली एकत्र यावे, असा आमचा नेहमीच आग्रह राहिला आहे. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने समस्त मराठी भाषिकांचे पुन्हा एकदा एकत्रीकरण झाले आहे. महाराष्ट्राला जोडले जाण्याच्या त्यांच्या इच्छेचा प्रभावीपणे पाठपुरावा व्हावा, यासाठी राष्ट्रवादी पक्ष महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी उभा आहे. महाराष्ट्रातील सर्वांचाच शुभम शेळके यांच्या उमेदवारीला पाठिंबा आहे.

शुभम शेळके यांच्या रूपाने येथील मराठी भाषिक संघर्ष करीत आहेत. त्यांचा एक चांगला मिलाफ झाला आहे. मात्र, येथे येऊन देवेंद्र फडणवीस यांनी मराठी भाषिकांच्या भावनेला छेद देण्याचे काम केल्याचा घणाघातही जयंत पाटील यांनी केला.

दिल्लीश्वरांना खूश करण्याचा फडणवीसांचा प्रयत्न

मराठी भाषिक चळवळीच्या लढय़ाचे प्रमुख केंद्र असलेल्या बेळगावात येऊन भाजप उमेदवाराचा प्रचार करणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेहमीच दिल्लीश्वरांना खूश करण्याच्या प्रयत्नात असतात. दिल्लीला बरे वाटेल असे बोलण्याची आणि वागण्याची त्यांची पद्धत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीबद्दल जी एक भावना असणे आवश्यक आहे, ती मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर त्यांच्याकडे दिसायला हवी होतील; पण यानिमित्ताने ती दिसली नाही, हे दुर्दैव आहे. त्यांनी येथे येऊन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात भूमिका घेणे टाळायला हवे होते, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

आपली प्रतिक्रिया द्या