
सात महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चेहऱ्यावरील हावभाव लपवण्याची कला नव्हती. पण आता त्यांना ती बऱ्यापैकी आत्मसात झाली आहे…त्यामुळे त्यांच्याकडे पाहून ‘तुम इतना जो मुस्करा रहे हो… क्या गम है जिसको छुपा रहे हो’ या गझलचा आधार घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची फिरकी घेतली तेव्हा सभागृहात हास्याचा एकच स्फोट झाला.
अर्थसंकल्पावर खुमासदार भाषण करताना जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आणि भाजपच्या सदस्यांना टोमणे मारत केलेल्या खुमासदार भाषणाने सभागृहात रंगत आणली. हळूच चिमटे काढत आणि कविता आणि गझलचा आधार घेत केलेल्या भाषणाने सभागृहात हास्याचे फवारे फुटत होते.
विघ्न दिसायला लागले
सत्तेत आल्यावर आमचे सरकार आले आणि विघ्न टळले असे बॅनर लावले. पण आता तुमचे सरकार आले आणि महाराष्ट्रावरील विघ्न खऱ्या अर्थाने दिसायला लागले असे सांगताच विरोधी बाकावर हास्याची लकेर उमटली.
गझल आणि काव्यपंक्ती
जयंत पाटील यांनी गझल आणि काव्यपंक्तींचा आधार घेत देवेंद्र फडणवीस व सत्ताधारी पक्षाला चिमटे काढले. ‘आँखो मे नमी हसी लबो पर, क्या हाल है क्या दिखा रहे हो…’ पण तुमच्या हातात आता काही नाही. तुमचे दिल्लीतील दोन क्रमांकाचे नेते आता सर्व घडवून आणत आहेत, असा टोला जयंत पाटील यांनी मारला.
राज्याची प्रगती खुंटली
राज्य सरकारने ‘निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान’ अशी जाहिरात केली आहे. त्याचा उल्लेख करताना जयंत पाटील म्हणाले की, गेल्या आठ महिन्यांत गतिमान होण्याऐवजी महाराष्ट्र मागे राहून गती कमी व्हायला लागली आहे, प्रगती खुंटायला लागली आहे. विकासवाढीचा दर पाहिला तर आमचे सरकार असताना 9.1 टक्के होता. स्थगिती सरकार आल्यावर 6. 8 टक्के झाला आहे, अशा शब्दांत राज्याच्या प्रगतीचे वर्णन केले.
कानाला लागणाऱ्यांचे भले होत नाही
जयंत पाटील यांचे भाषण सुरू असताना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सभागृहात नव्हते. त्याचा उल्लेख करीत ते म्हणाले की, ‘त्यांच्या कानाला सतत लागणाऱ्यांनी माझ्या भाषणाची आठवण करून दिली तर बरे होईल,’ असा टोला मारला. यावरच न थांबता मंत्री शंभुराज देसाई यांच्या नावाचा उल्लेख करीत ‘कानाला लागणाऱ्यांचे कधी भले होत नाही,’ असा चिमटा काढताच सभागृहात हास्याची लकेर उमटली.
































































