भाजपची माशासारखी तडफड, सत्तेशिवाय राहू शकत नाही – जितेंद्र आव्हाड

2322
ncp leader jitendra awhad

‘भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे की सत्तेशिवाय ते राहू शकत नाही. जसा पाण्यातून मासा बाहेर आल्यावर तडफड करतो तसे भाजपवाले दिसताहेत. आज महाराष्ट्राची मान शरमेनं खाली गेली’, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विरोधी पक्ष भाजपवर सडकून टीका केली. विधानसभेच्या दुसऱ्या दिवसाचे कामकाज सुरू असताना विरोधी पक्षात असलेले भाजप आमदार सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या अंगावर धावून गेले. ही गंभीर बाब असल्याने सभागृहाचे कामकाज आधी अर्धा तास आणि त्यानंतर आणखी 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते.

या दरम्यान पत्रकारांसमोर बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी भाजप आमदारांच्या वर्तनाची निंदा करत त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. ‘सरकार येऊन अवघे काही दिवस झाले असताना सरकारकडून तुमचं पाच वर्षांचं अपयश लगेच धुवून काढणं शक्य आहे का? धुतल्यानंतर कपडे वाळायला, इस्त्री करून यायला दोन दिवस लागतात. मात्र भाजपने सरकारने त्यांच्या पाचवर्षांच्या काळात महाराष्ट्राची घडीच बिघडवून टाकली होती. ही घडी बसवायला दोन दिवस पुरणार नाहीत, कमीत-कमी दोन तीन वर्ष लागतील’, असे आव्हाड यावेळी म्हणाले.

‘या पद्धतीने मारामारीपर्यंत येणं हे भाजपला शोभा देतं का? केंद्रात सरकार यांचंच असून तेही देशभर मारामाऱ्याच करायला लावतं आहे. राज्यात विरोधी पक्षात असून देखील अंगावर येताहेत. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. सर्वांना एकत्र घेऊन राज्यकारभार चालवण्याची महाराष्ट्राची संस्कृती आहे. ही संस्कृती महाराष्ट्राने बघितली आहे’, असे त्यांनी सांगितले.

सरकार स्थापन झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी अंगावर येणं असा आजपर्यंतचा इतिहास नसल्याचंही ते म्हणाले. जगभरात साधारण सहा-आठ महिने सत्ताधारी पक्षाला स्थिरस्थावर होण्यासाठी विरोधीपक्ष संधी देतात असा विवेक पाळला जातो. इथे तर जणूकाही उद्याच युद्धाची समाप्ती होणार आहे, नारायणास्त्र वापरून सगळ्यांचा नाश करून टाका. अशा प्रकारची मानसिकता दिसत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

आपली प्रतिक्रिया द्या