बीड : राष्ट्रवादीला मोठा धक्का, मोहन जगताप भाजपमध्ये प्रवेश करणार

सुधीर नागापुरे । माजलगाव

बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छत्रपती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मोहन जगताप हे सोमवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या या प्रवेशाने माजलगाव तालुक्याचे राजकीय समीकरण बदलणार एवढे निश्चित असून जगतापांचे कट्टर विरोधक माजीमंत्री प्रकाश सोळंके यांना विधानसभेसाठी आव्हान ठरणार आहे.

मोहन जगताप यांचे वडील बाजीराव जगताप माजलगाव मतदारसंघाचे युतीच्या काळात आमदार होते. शिवसेना-भाजप युती सरकार सत्तेवर असताना जगताप यांना साखर कारखाना परवानगी मिळाली परंतु त्यांचे विरोधक प्रकाश सोळंके यांनी सतत अडथळे निर्माण केल्याने कारखाना उभारणीस तब्बल तेरा वर्षे लागली. मागील चार वर्षांपासून या कारखान्याच्या माध्यमातून जगताप यांनी विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे. जो पक्ष उमेदवारी देईल तर ठीक अन्यथा अपक्ष अशी घोषणा करून जगताप यांची मतदारसंघात वाटचाल सुरू होती. तसेच मागील वर्षभरापासून त्यांनी राष्ट्रवादीचा संपर्क तोडला होता. अखेर त्यांचे भाजपशी बोलणे होऊन कोडे सुटले.

सोमवारी बीड येथे युतीच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे आपला अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी जगताप हे आपल्या मित्र मंडळासह भाजपात प्रवेश करणार असल्याचे स्वतः मोहन जगताप यांनी सांगितले.