‘तारीख ते तारीख’विरोधात नवाब मलिक सुप्रीम कोर्टात; याचिकेची गंभीर दखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात जामीन अर्जावर ‘तारीख पे तारीख’ सुरू असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री नवाब मलिक यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी त्यांच्या याचिकेची गंभीर दखल घेतली. उद्या मंगळवारी तातडीने मुंबई उच्च न्यायालयापुढे याचिका निदर्शनास आणून द्या, तिथे सुनावणी घेतली न गेल्यास पुन्हा सर्वोच्च न्यायालयात या, अशी मुभा न्यायमूर्ती खन्ना यांनी मलिक यांना दिली.

मलिक हे सध्या कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहेत. ते किडनी विकाराने त्रस्त आहेत. त्यामुळे त्यांनी वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर करण्याची विनंती करीत मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. याआधी न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्यापुढे त्यांच्या जामिनाची सुनावणी अंतिम टप्प्यात आली होती. मात्र न्यायमूर्ती कर्णिक यांची गोव्यात बदली झाल्यामुळे मलिक यांना न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्यापुढे नव्याने दाद मागावी लागली आहे. त्यानंतर जामिनाच्या सुनावणीची रखडपट्टी झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मलिक यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि सुनावणीला गती देण्यासाठी निर्देश देण्याची विनंती केली. त्यांच्या याचिकेची न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी गंभीर दखल घेतली. तुम्ही उद्या पुन्हा तुमची याचिका उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्या, त्यावर सुनावणी घेतली न गेल्यास सर्वोच्च न्यायालयात या, अशी मुभा न्यायमूर्ती खन्ना यांनी मलिक यांना दिली.