‘हिम्मत असेल तर माझ्यावर दावा ठोका’, मलिकांचे समीर आणि दाऊद वानखेडे यांना आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्रूझ ड्रग्ज प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे आमनेसामने आले आहेत. नवाब मलिक यांनी एक जन्म दाखला शेअर केला आहे, जो समीर वानखेड यांचा असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मलिक यांनी दावा केला आहे की, समीर वानखेडे हे मुस्लिम असून त्यांनी बनावट जात प्रमाणपत्र बनवून सरकारी नोकरी मिळवली आहे. नवाब मलिक यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन आपण आपल्या दाव्यावर ठाम असल्याचे म्हणाले आहेत.

मलिक म्हणाले की, यापूर्वी बनावट प्रमाणपत्राद्वारे लोकांना नोकऱ्या मिळाल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे छाननी समिती स्थापन करण्यात आली. जेव्हा कोणी आरक्षणाचा लाभ घेऊन नोकरी घेते, तेव्हा त्याचे प्रमाणपत्र सत्यापित करणे आवश्यक आहे. मुंबई आयुक्त कार्यालयातून हे प्रमाणपत्र जारी करण्यात आले आहे. मात्र याची वैधता तपासावी, अशी कोणतीही तरतूद केंद्र सरकारमध्ये नाही. याबाबत फक्त जिल्हाधिकाऱ्यांकडूनच माहिती घेतली जाते आणि प्रमाणपत्र देऊन नोकरी दिली जाते.

मलिक पुढे म्हणाले की, “मी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. ज्यामुळे अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. माझी लढाई एनसीबीसोबत नाही. गेल्या 35 वर्षात एनसीबीने खूप चांगले काम केले आहे. याआधी कोणीही एनसीबीच्या कामावर शंका उपस्थित केलेली नाही. पण एक व्यक्ती फसवणूक करून सरकारी नोकरी मिळवतो आणि जेव्हा मी या गोष्टी समोर आणल्या तेव्हा नवाब मलिक अधिकाऱ्याच्या खाजगी आयुष्याबद्दल सार्वजनिकरित्या भाष्य करत आहे असे म्हटले जाते. त्यांच्या कुटुंबातील लोकांना यामध्ये खेचले जात आहे असे म्हटले जात आहे. मी कोणाविषयी असा काहीही प्रकार केलेला नाही.” यावेळी बोलताना मलिक म्हणाले की, ”मी दिलेले कागदपत्रे खोट असल्यास माझ्यावर दावा करा, असे आव्हान नवाब मलिक यांनी समीर आणि दाऊद वानखेडे यांना केले आहे.”