
सामना ऑनलाईन । पिंपरी चिंचवड
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवडमध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातील पराभवावर चिंतन बैठक पार पडली. यावेळी पिंपरी चिंचवड आणि भोसरी विधानसभेचा आढावा घेण्यात आला. विधानसभेच्या तयारीसाठी आतापासूनच घरोघरी जाऊन मतदारांना भेटलात तर ऐनवेळी आठवण काढली का ? असा प्रश्न मतदार उपस्थित करणार नाहीत. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस)ची प्रचार यंत्रणा लक्षात घेऊन त्याप्रमाणे प्रचार करा असा सल्ला पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.
पार्थ पवार यांचा निवडणुकीत झालेला पराभव हा पवार घराण्यातलील पहिलाच पराभव आहे. हा पराभव राष्ट्रवादीच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघातील पराभवावर पक्षाध्यक्षांसह महत्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवडमध्ये चिंतन बैठक पार पडली. यावेळी पवारांनी आरएसएसच्या प्रचार तंत्राचे कौतुक करत, “आरएसएसवाले पाच घरांमध्ये भेटायला गेले अन एक घर बंद असेल तर ते संध्याकाळी जातात. संध्याकाळीही बंद असेल तर सकाळी जातात पण त्या घरी जाऊनच येतात” असं मला एका खासदाराने सांगितल्याचे पवार म्हणाले. तसेच विधानसभेत जास्तीत जास्त नवीन चेहरे द्यावेत, असं सूचित करत, विलास लांडे यांनी उमेदवारी नको सांगितल्याचे ऐकून मला खूप बर वाटलं, त्यांच्याकडून मी ही प्रेरणा घेतली अशी मिश्कील प्रतिक्रिया दिली. लोकांना बदल हवा असतो, तेच तेच चेहरे नकोत म्हणून नव्यांना संधी द्यावी लागेल असा सूचक इशारा यावेळी पवारांनी दिला.



























































