‘कुछ रिश्ते दिल से बनते हैं यार’ सुप्रिया सुळे यांचा अजित पवारांवर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
supriya-sule

राजकारण हा भातुकलीचा खेळ नसतो. यात नाती नसतात, जबाबदारी असते. काम आणि नाती वेगवेगळय़ा जागेवर असतात. मी माझे काम जबाबदारीने करत असते. रक्ताची नसली तरी प्रेमाची, विश्वासाची नाती खूप आहेत. कुछ रिश्ते दिल से बनते है यार, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा, खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आज निशाणा साधला.

बारामती मी व माझ्या कुटुंबाविरुद्ध इतर सर्व पवार कुटुंबीय प्रचार करेल, आम्हाला एकटे पाडले जाईल अशी शक्यता अजित पवार यांनी व्यक्त केली होती. त्यावर सुप्रिया सुळे यांना माध्यमांनी विचारले असता, आमच्या कुटुंबाला तुम्ही राजकारणात कशाला आणता, असा सवाल केला. सर्वच माझे कुटुंबीय आहेत, त्यांचे कुटुंबीय हेसुद्धा माझे कुटुंबीय आहेत, वेगवेगळे कुटुंब दाखवता येत नाही, असे प्रत्युत्तर सुप्रिया सुळे यांनी दिले. आमचे सगळे कुटुंब राजकारणात नाही. प्रत्येकजण आपलाल्या क्षेत्रात काम करतो, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. नाती माझ्यासाठी राहतीलच, पण आता वैचारिक लढा सुरू आहे, एका व्यक्तीविरोधात ही लढाई नाही, तर भाजपच्या विचाराविरोधात माझी लढाई आहे, असेही त्यांनी सांगितले.

संसदेत भाषण करा, आम्ही सेल्फी काढत फिरत नाही अशीही टीका अजित पवार यांनी केली होती. त्यालाही सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिले. संसद ही भाषण करण्यासाठीच असते. आमच्यासाठी ही इमारत नसून विचारांचे मंदिर आहे. मोदी निवडून आले तेव्हा ते संसदेच्या इमारतीवर नतमस्तक झाले. या लोकशाहीच्या मंदिरात चर्चा करण्यासाठीच लोकांनी आम्हाला पाठवले आहे. सर्व प्रस्ताव तिथेच मंजूर होतात, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सेल्फीबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, पंतप्रधान मोदीच सेल्फी काढण्यासाठी प्रोत्साहन करत असतात. मोदी यांचे फोटो देशातील शाळा-कॉलेजमध्ये लावण्यात आले आहेत, तिथे सेल्फी पॉइंट तयार करण्यात आले आहेत. त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा जीआर काढण्यात आला आहे, असे त्या म्हणाल्या.