शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार उभा केला की त्या मतदारसंघात अचानक अपक्ष उमेदवारही अर्ज करायचा आणि तो अजित पवारांना भेटायचा. हे अपक्ष उमेदवार कोण उभे करायचे आणि पक्षाच्या आमदारांची संख्या 100 पार का नाही जाऊ शकली, याचे कारण यामध्ये आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री अजितदादाच पक्षाच्या विरोधात अपक्ष उमेदवार उभे करायचे, असेच रोहित पवार यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले आहे.
वृत्तवाहिन्यांशी बोलताना रोहित पवार यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केले. अजित पवारांनी पक्षवाढीला मदत केली; पण त्यांना पहिली संधी साहेबांनी (शरद पवार) दिली. पेंद्र सरकारमध्ये असताना शरद पवार यांनी राज्यातील सरकारला ताकद दिली. जेव्हा कोणती अडचण आली तेव्हा शरद पवारांनी निर्णय घेतले. अडचणीच्या काळात या नेत्यांना निर्णयसुद्धा घेता येत नव्हते, असा टोला रोहित पवार यांनी लगावला.