दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार, पुणे महापालिकेसाठी हालचालींना वेग – अंकुश काकडे

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडताना दिसत आहे. फुटलेली राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याच्या दिशेने पावले टाकत असून, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीसोबत एकत्र निवडणूक लढवण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी दिली.

महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपविरोधात ताकद एकवटण्याचे प्रयत्न वेगाने सुरू असून, आज उशिरा महाविकास आघाडीतील घटक पक्षांची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत जागावाटप, रणनीती आणि एकत्र लढण्याबाबत सविस्तर चर्चा होणार असल्याचे संकेत आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही काँग्रेसचे निरीक्षक माजी मंत्री सतेज पाटील यांच्याशी पुणे महापालिकेत आघाडी म्हणून एकत्र लढण्याबाबत प्राथमिक चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. आज झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी (शरद पवार) गटाकडून ॲड. वंदना चव्हाण, अंकुश काकडे, विशाल तांबे, तर राष्ट्रवादी (अजित पवार) गटाकडून आमदार चेतन तुपे, शहराध्यक्ष सुनील टिंगरे, सुभाष जगताप सहभागी झाले होते.

या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून, महाविकास आघाडीतील मित्र पक्षांसोबतही निवडणूक लढवण्यावर अनुकूल वातावरण असल्याचे स्पष्ट झाले आहे. मित्र पक्षांच्या प्रमुखांशी स्वतंत्रपणे चर्चा केली जाणार असल्याचेही काकडे यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढल्यास कोणत्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवायची, हा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. हा निर्णय स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणांनुसार होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अजित पवार गटाला महापालिकेसाठी मिळेनात उमेदवार, भाजपने टाकल्याने पवारांची तारेवरची कसरत

प्रशांत जगताप यांचा राजीनामा नाही

शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला नाही. आजच्या बैठकीसाठी त्यांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, ते मुंबईला असल्याने बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांच्याशी सातत्याने संवाद साधत असून, जगताप आमच्यासोबत राहतील, असा विश्वास असल्याचे अंकुश काकडे यांनी स्पष्ट केले.