सातारा बँक राष्ट्रवादीकडेच; शिवेंद्रराजेंचा डाव फसला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्षपद पटकावण्याचा भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा डाव अखेरच्या क्षणी फसला. राष्ट्रवादीने ही बँक आपल्याकडेच ठेवत अध्यक्षपदी नितीन पाटील, तर उपाध्यक्षपदी अनिल देसाई यांची नियुक्ती केली.

जिल्हा बँक निवडणुकीच्या निकालानंतर साताऱयातील राजकीय वातावरण चांगलेच पेटले होते. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपही झाले. बँकेच्या अध्यक्षपदावरून राजकीय खलबतेही सुरू होती. शिवेंद्रराजे यांनी अध्यक्षपदासाठी थेट राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन फिल्डिंगही लावली होती.

अध्यक्षपदाच्या निवडीसाठी सर्वपक्षीय बैठकीत मात्र शिवेंद्रराजेंना धक्का बसला. या बैठकीला खासदार उदयनराजे भोसले, विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, शिवेंद्रराजे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील आदी नेते उपस्थित होते. या बैठकीत आमदार मकरंद पाटील यांचे धाकटे बंधू नितीन पाटील यांना अध्यक्ष करण्यावर एकमत झाले. बँकेच्या निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांचा झालेला पराभव आणि आमदार पाटील यांच्या विरोधामुळे शिवेंद्रराजेंचे अध्यक्षपद हुकल्याचे बोलले जात आहे.