
महाराष्ट्र दिल्लीसमोर कधी झुकला नाही आणि झुकणार नाही अशी आमची भावना होती. मात्र आता रोजच महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकतोय, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातील नव्या सरकारकर केली आहे. केंद्र सरकार महाराष्ट्रामध्ये दडपशाहीचे राजकारण करत आहे. सध्या सर्वच निर्णय दिल्लीतून होताना दिसतायत. यावरून राज्यात दोन पक्षांचे सरकार नसून फक्त भाजपचे सरकार आहे असे वाटत असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात जे सत्तेत होते ते आता स्वतःच घेतलेल्या तत्कालीन निर्णयांना आव्हान देत आहेत. हे नवीनच होत असल्याचे दिसत आहे. राज्याचे सर्व निर्णय दिल्लीतून होत आहेत, याचा अर्थ महाराष्ट्रातील सरकार दिल्लीच चालवत असल्याचा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे. केंद्र सरकारला महाराष्ट्राच्या जनतेबाबत काय आस्था असणार, असा सवालही त्यांनी केला. तसेच केंद्राकडून सूडाचे राजकारण केले जात आहे. जे सरकारविरोधात बोलतील त्यांच्यावर कारकाई केली जात आहे. हे असे याआधी कधीच पाहिले नसल्याचेही त्या म्हणाल्या.
छोटय़ा गोष्टींसाठी मुख्यमंत्री दिल्लीत जातात
राज्यातील आगदी छोटय़ा गोष्टींसाठी सध्या मुख्यमंत्री दिल्लीत जातात. मात्र त्यांना तेथे अनेक तास दिल्लीश्वरांची भेट मिळत नसल्याने ताटकळत थांबावे लागत असल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे. हे राज्याचे दुर्दैव असल्याचे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी असे कधीच घडलेले नाही. दोन पक्षांचे सरकार असले तरी एक पक्ष कुठे आहे हे दिसतच नाही. सर्वच भाजप चालवत असल्याचे चित्र असल्याचेही त्यांनी सांगितले.


























































