
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री दिवंगत एनडी तिवारी यांचा मुलगा रोहीत तिवारी याच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे. रोहितचा मृत्यू नैसर्गिक असला तरी त्याला मानसिक यातना देण्यात आल्या. ज्यांनी हे केले त्यांची नावे वेळ आल्यावर जाहीर करणार. कारण ही वेळ योग्य नाही, असे रोहितच्या आई उज्ज्वला यांनी सांगितले. त्यांच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.
रोहितच्या मृत्यूचे नेमके कारण काय असा प्रश्न पत्रकारांनी उज्ज्वला यांना विचारला होता. यावर उत्तर देताना उज्ज्वला यांनी रोहितच्या मृत्यूमागे असामान्य असे काही नाही, पण त्याचा मृत्यू कुठल्या परिस्थितीत झाला. त्यामागे कोण होते. हे मी सगळं वेळ आल्यावर सांगणार आहे, असे त्या म्हणाल्या. त्याचबरोबर रोहितला कधीही न्यूरोशी संबंधित समस्या नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रोहित यांचे मंगळवारी संशयास्पद स्थितीत निधन झाले. तो दक्षिण दिल्लीतील डिफेन्स कॉलनीत पत्नी व आईसोबत राहत होता. मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता त्याला मॅक्स रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. रोहितची आई देखील त्याच रुग्णालयात चेकअपसाठी आली होती. मुलाची तब्येत बिघडल्याचे तसेच त्याच्या नाकातून रक्त वाहत असल्याचे उज्ज्वला यांना रुग्णालयातच समजले होते. घरातील नोकरांनी त्यांना फोनवर याबद्दल सांगितले होते. त्यानंतर अँम्ब्युलन्समधून रोहितला मॅक्स रुग्णालयात आणण्यात आले. पण ड़ॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने एक पत्रक जारी केले. ज्यात रोहितला मॅक्स रुग्णालयात 4 वाजून 41 मिनिटांनी आणण्यात आल्याचे व डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल्याचे सांगण्यात आले होते.
चाळीस वर्षीय रोहितने तो एनडी तिवारीचा मुलगा असल्याचा दावा केला होता. सहा वर्ष न्यायालयीन लढाई जिंकल्यानंतर एनडी तिवारीच रोहितचे वडील असल्याचे स्पष्ट झाले होते. एनडी तिवारी हेच माझे जैविक वडील असल्याचा दावा रोहितने केला होता. रोहितच्या या दाव्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर डिएनए चाचणीत एनडी तिवारी हेच रोहितचे वडिल असल्याचे स्पष्ट झाले होते. गेल्या वर्षीच रोहितचा अपूर्वा नामक तरुणीबरोबर विवाह झाला. मात्र गेल्याच वर्षी एनडी तिवारी यांचे त्यांच्या जन्मदिनीच 18 ऑक्टोबर रोजी निधन झाले होते.
























































