एखंडे कुटुंबास न्याय मिळवून देऊ- नीलम गोऱ्हे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, माजलगाव

प्रसूती दरम्यान बाळासह मृत्यू पावलेल्या येथील मीरा एखंडे या महिलेच्या कुटुंबाची शासनाने सातही मुलीची जबाबदारी घेऊन कुटुंबास आर्थिक मदत मिळाली पाहिजे यासाठी आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असून न्याय मिळवून दिला जाईल असे आश्वासन शिवसेना उपनेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिले.

येथील शासकीय विश्रामगृहावर सोमवारी मयत मीरा एखंडे यांचे पती रामेश्वर व सात मुलींनी गोऱ्हे यांची भेट घेतली. 28 डिसेंबर रोजी शहरातील समता कॉलोनी भागातील मीरा रामेश्वर एखंडे या महिलेस प्रसूतीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता बाळासह मिराचा मृत्यू झाला होता. हा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणा झाल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करावी अशी मागणी नातेवाईकांसह समाजातुन झाली.

सोमवारी नीलम यांनी एखंडे कुटुंबीयांशी एकांतात सविस्तर चर्चा केली. तर आईपासून पोरक्या झालेल्या सातही मुलीशी आस्थेवाईकपणे विचारपूस करून त्यांच्या शिक्षणाची बाहेरगावी व्यवस्था करण्यासाठी आपण तातडीने प्रयत्न करू,तसेच या सर्व घटनेप्रकरणी आपण गंभीर असून मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून या कुटुंबास आर्थिक मदतीसह चौकशी तातडीने करावी यासाठी बोलून कुटुंबास न्याय मिळवून देऊ असा दिलासाही त्यांनी दिला. यावेळी जिल्हा संघटक संजय महाद्वार,महिला आघाडीच्या वंदना चव्हाण,उपजिल्हाप्रमुख सुशील पिंगळे, तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव, रामराजे सोळंके, शहरप्रमुख पापा सोळंके, दत्ता रांजवन, नितीन मुंदडा, सुनील खंडागळे, सुरज गवरकर, सुरज एखंडे आदी उपस्थित होते.