
हिंदुस्थानचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याला लष्करात बढती मिळाली आहे. नीरज चोप्रा याची प्रादेशिक लष्करात लेफ्टनंट कर्नल म्हणून नियुक्ती झाली आहे. ही घोषणा संरक्षण मंत्रालयाने हिंदुस्थान सरकारच्या साप्ताहिक अधिकृत मासिक ‘गॅझेट ऑफ इंडिया’ मध्ये केली. नीरज चोप्रा याची नवीन रँक 16 एप्रिल 2025 पासून लागू झाली आहे. यापूर्वी तो सैन्यात सुभेदार पदावर होता.
भालाफेक हा खेळ प्रकार नीरज चोप्रामुळे हिंदुस्थानात प्रसिद्ध झाला. वर्ष 2020 च्या टोकियो ऑलिंपिकमध्ये नीरज चोप्राने हिंदुस्थानसाठी भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. तेव्हापासून तो प्रसिद्धीच्या झोतात आला. 2024 च्या पॅरिस ऑलिंपिकमध्येही त्याने रौप्य पदक जिंकले होते. दरम्यान, पुढील आठवड्यात बेंगळुरूमध्ये होणारा एनसी क्लासिक पुढे ढकलण्यात आल्यानंतर नीरज चोप्रा 23 मे रोजी पोलंडमधील चोरझो येथे होणाऱ्या 71 व्या ऑर्लेन जानूझ कुसोझिन्स्की मेमोरियल कार्यक्रमात भाग घेईल.