आता थांबायचं नाय… नीरज चोप्रानं प्रतिष्ठेची पॅरिस डायमंड लीग स्पर्धा जिंकली, ज्युलियन वेबरचा बदला घेतला

हिंदुस्थानचा स्टार भालाफेकपटू आणि ऑलिम्पिक सुवर्णपदकविजेता नीरज चोप्रा याने पॅरिस डायमंड लीग स्पर्धा जिंकली आहे. फ्रान्सच्या स्टेड सेबास्तियन येथे पार पडलेल्या या स्पर्धेत नीरज चोप्रा याने 88.16 मीटर भाला फेकत अव्वल स्थान पटकावले.

गेल्या वर्षी ऑलिम्पिकच्या तयारीमुळे नीरजला पॅरिस लीगला मुकावे लागले होते. मात्र, यंदा तो पूर्ण ताकदीने या लीगमध्ये उतरला. नीरजने याआधी 2017 मध्ये ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन म्हणून पॅरिस डायमंड लीगमध्ये भाग घेतला होता. त्या वेळी त्याने 84.67 मीटर भालाफेक करत पाचवे स्थान पटकावले होते.

आठ वर्षांनंतर नीरज या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या पॅरिस टप्प्यात आपले कौशल्य पणाला लावण्यासाठी उतरला. त्याच्यापुढे जर्मनीच्या ज्युलियन वेबर याचे तगडे आव्हान होते. गेल्या दोन स्पर्धांमध्ये दोघांमध्ये तगडी टक्कर पाहायला मिळाली होती आणि नीरजवर वेबर भारी पडला होता. मात्र यावेळी नीरजने बदला घेत स्पर्धेवर मोहोर उमटवली.

नीरज चोप्रा याने आपल्या पहिल्याच प्रयत्नामध्ये 88.16 मीटर भाला फेकला. पहिला प्रतत्नच विजेतेपदासाठी पुरेसा ठरला. तर दुसरीकडे नीरजचा प्रतिस्पर्धी वेबर याने 87.88 मीटर लांब भाला फेकला. त्याला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या ब्राझिलच्या लुईझ मॉरीसिओ डायस दा सिल्वा याने 86.62 मीटर भाला फेकला.