आसिफचे 41 चेंडूंत शतक तरीही नेपाळचा विजय; वनडे वर्ल्डकपच्या पात्रता फेरीत नेपाळचे स्थान निश्चित

अभूतपूर्व गर्दीत खेळला गेलेला सामना अत्यंत नाटय़मयरित्या अंधुक प्रकाशामुळे थांबविण्यात आला आणि डकवथ-लुईस नियमाच्या आधारे नेपाळला यूएईविरुद्ध 9 धावांनी विजयी घोषित करण्यात आले. या विजयामुळे 12 सामन्यांत 11 विजय नोंदविणारा नेपाळचा संघ आगामी वन डे वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीसाठी पात्र ठरला आहे. त्यामुळे पुढील चार वर्षे नेपाळचा संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिसत राहील.

यूएईने प्रथम फलंदाजी करताना मुहम्मद वसीम (63), वृत्य अरविंद (94) आणि आसिफ खान (ना.101) यांच्या फलंदाजीमुळे 50 षटकांत 6 बाद 310 धावा केल्या होत्या. 311 धावांचा पाठलाग करताना नेपाळने 44 षटकांत 6 बाद 269 धावा केल्या होत्या आणि मैदानात अंधार पसरल्यामुळे पंचांनी खेळ तेथेच थांबविला. तेव्हा सामन्याचा निकाल काढण्यासाठी पंचांनी डकवर्थ-लुईसची मदत घेतली. त्यानुसार नेपाळला विजयासाठी 260 धावांची गरज होती आणि त्यांनी 269 धावा केल्या होत्या. त्यामुळे पंचांनी नेपाळला 9 धावांनी विजयी घोषित केले. या निर्णयामुळे काही काळ मैदानात गोंधळाचे वातावरण झाले होते.

42 व्या षटकांत सामना फिरला
41 व्या षटकांत नेपाळ डकवर्थ-लुईसच्या शर्यतीत काहीसा मागे होता, पण 42 व्या षटकाने सामना फिरविला. नेपाळच्या गुलशन झाने मुहम्मद वसीमच्या या षटकांत 20 धावा ठोकल्या. त्याने सलग एक षटकार आणि तीन चौकार ठोकत नेपाळला आघाडी मिळवून दिले. याच षटकामुळे नेपाळने अनपेक्षितरित्या विजय मिळविला. अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबविला तेव्हा नेपाळला 36 चेंडूंत 42 धावांची गरज होती. गुलशनने सातव्या विकेटसाठी दीपेंद्र ऐरीबरोबर केलेली 44 धावांची भागी सर्वात महत्त्वाची ठरली. आजच्या या सामन्यासाठी नेपाळी क्रिकेटप्रेमींनी अभूतपूर्व गर्दी केली होती. विजयानंतर अवघ्या नेपाळमध्ये जल्लोष साजरा केला.

आसिफ खानच्या 19 चेंडूंत 79 धावा
रोहन मुस्तफा 38 व्या षटकांत बाद झाला तेव्हा आसिफ खान मैदानात आला. तेव्हा यूएईने 37.3 षटकांत 5 बाद 175 धावा केल्या होत्या. सुरुवातीला आसिफ सावध खेळत होता. त्याने पहिल्या 24 धावांसाठी 23 चेंडू घेतले होते. यात केवळ 2 चौकारांचाच समावेश होता. यूएईने 45.4 चेंडूंत 223 धावा केल्या होत्या. त्यानंतर अचानक गुलशनच्या बॅटीत ताकद आली आणि त्याने पुढील 19 चेंडूंत 6, 6, 1, 6, 6, 1, 4, 6, 6, 1, 0, 6, 6, 6, 6, 1, 6, 4, 1 असे फटके मारत 79 धावा चोपून काढल्या. त्याने 41 व्या चेंडूंवर वन डे इतिहासातील चौथे वेगवान शतक झळकावताना 4 चौकार आणि 11 षटकार ठोकले. वन डेतील सर्वात वेगवान शतके एबी डिव्हिलियर्स (31 चेंडू), कोरी ऍण्डरसन (36 चेंडू) आणि शाहिद आफ्रिदी (37) यांनी ठोकली आहेत.