
नेपाळचे पंतप्रधान केपी ओली शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सोशल मीडियावरील बंदीनंतर नेपाळमध्ये हिंसक आंदोलन सुरू झाले आहे. सोमवारी मध्यरात्री ही बंदी मागे घेण्यात आली असली तरी आंदोलकांनी पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करत मंगळवारीही काठमांडूमध्ये दगडफेक, जाळपोळ केली. अखेर Gen-Z च्या रेट्यापुढे केपी शर्मा ओली यांना झुकावे लागले आणि त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर ते दुबईला पळ काढण्याची शक्यता आहे.
Nepal Prime Minister K.P. Sharma Oli resigns amid violent protests in Kathmandu over alleged corruption. pic.twitter.com/6VbW7AGidY
— ANI (@ANI) September 9, 2025
सोमवारी रात्री कॅबिनेट बैठकीनंतर सोशल मीडियावरील बंदी मागे घेण्यात आली. मात्र या निर्णयानंतरही आंदोलक शांत झाले नाहीत. उलट आंदोलन आणखी तीव्र झाले आणि संपूर्ण काठमांडूवर आंदोलकांनी कब्जा मिळवला. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्या निवासस्थानावर आंदोलकांनी कब्जा करत तोडफोड, जाळपोळ केली. यावेळी आंदोलकांनी पोलिसांवरही दगडफेक केली.
नेपाळमध्ये सुरू आंदोलनाला राजकीय समर्थनही मिळत आहे. अनेक मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. एवढेच नाही तर राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीच्या 21 खासदारांनीही सामूहिक राजीनामा दिला. रवि लामिछाने यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने संसद भंग करून पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी केली आहे.
विमानतळ बंद करण्याची तयारी
दरम्यान, हिंसक आंदोलन पाहता त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद करण्याची तयारी सुरू आहे. मंत्री आणि त्यांच्या जवळच्या लोकांना सैन्याच्या हेलिकॉप्टरद्वारे विमानतळावर नेले जात आहे. पाच हेलिकॉप्टरद्वारे मंत्र्यांसह त्यांच्या नातेवाईकांना सुरक्षित स्थळी नेले जात आहे.
#WATCH | Nepal: Vehicles damaged and set on fire in Kathmandu, as protesters continue their demonstration against alleged corruption. pic.twitter.com/uGgx4rJvJM
— ANI (@ANI) September 9, 2025