
मुंबई-पुण्यातील लाखो पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारी नेरळ-माथेरानची मिनी ट्रेन पुन्हा प्रवासी सेवेत धावणार आहे. मध्य रेल्वेने मिनी ट्रेन सुरू करण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. पुढील महिन्याच्या सुरुवातीला, 7 नोव्हेंबरपासून मिनी ट्रेनची सेवा सुरू केली जाणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. महिनाभराच्या विलंबानंतर मिनी ट्रेन प्रवासी सेवेत दाखल होणार आहे. दरम्यान, मिनी ट्रेनच्या नवीन वेळापत्रकाची प्रतीक्षा कायम आहे.
दरवर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर मिनी ट्रेनची सेवा सुरू होते. यंदा मात्र लांबलेल्या पावसामुळे ‘माथेरानच्या राणी’ची पावसाळी हंगामानंतरची धाव उशिराने सुरू होत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव दरवर्षी पावसाळय़ात मिनी ट्रेनची सेवा तात्पुरती बंद केली जाते. तथापि, या काळात अमन लॉज ते माथेरान शटल सेवा चालवली जाते. यावेळी नेरळ-माथेरान मार्गावर दररोज दोन अप आणि दोन डाऊन ट्रेन धावणार आहेत. सहा डब्यांच्या मिनी ट्रेनमध्ये तीन द्वितीय श्रेणीचे कोच, एक प्रथम श्रेणीचा कोच आणि दोन द्वितीय श्रेणीच्या सामानाच्या व्हॅनचा समावेश असणार आहे. ही सेवा पुन्हा सुरू करण्याची तयारी मध्य रेल्वेने पूर्ण केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 नोव्हेंबरपासून मिनी ट्रेन पर्यटकांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मिनी ट्रेनचे नवीन वेळापत्रक कधी जाहीर केले जाणार याकडे पर्यटकांचे लक्ष लागले आहे.




























































