जिवंत व्यक्तीला मृत दाखवून फ्लॅट परस्पर विकले

जिवंत व्यक्तीला मृत दाखवून त्याचे दोन फ्लॅट परस्पर विकल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले राष्ट्रवादीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे फरार झाले आहेत. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकिटावर उमेदवारी मिळवणारे अशोक गावडे निवडणूक संपताच गायब झाले असून नेरुळ पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहे.

कौस्तुभ कुलकर्णी यांचे वडील सुधाकर कुलकर्णी यांचे 13 एप्रिल 2019 मध्ये निधन झाले. त्यानंतर ते नेरुळ येथील श्री गणेश सोसायटीमध्ये गेले असता त्यांना जोरदार धक्का बसला. कुलकर्णी यांच्या मालकीचे दोन्ही फ्लॅट सोसायटीचे अध्यक्ष अशोक गावडे आणि त्यांच्या सहकाऱयांनी परस्पर विकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हा व्यवहार करताना 2006 मध्ये सुधाकर कुलकर्णी यांच्या मृत्यूचा दाखला तयार करून त्यांचे दोन्ही फ्लॅट संतोष तावरे यांना विकण्यात आले. याप्रकरणी कौस्तुभ कुलकर्णी यांनी नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर गावडे यांच्या चौकशीसाठी पोलीस धडकले. मात्र त्याआधीच ते फरार झाले होते, अशी माहिती नेरुळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी दिली. दरम्यान अटकपूर्व जामिनासाठी अशोक गावडे यांनी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली असून त्याची सुनावणी 18 नोव्हेंबरला होणार आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या