नेस्कोमधील नव्या कोरोना रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, गोरेगावच्या नेस्कोमधील नव्याने उभारण्यात येत असलेल्या 224 बेडच्या जम्बो कोविड रुग्णालयाचा महापौरांनी आज आढावा घेतला. आयसीयू युनिटपासून सिटीस्कॅनपर्यंतच्या सर्व अत्याधुनिक सुविधा या रुग्णालयात आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरपालिकेने अवघ्या 45 दिवसांत हे रुग्णालय उभारले आहे. या रुग्णालयात आयसीयू युनिट, डायलिसिस सेंटर, सिटीस्कॅन, नियंत्रण कक्ष, ऑक्सिजन पुरवठा करणारे युनिट तसेच हवा शुद्धीकरण केंद्र आहे. नेस्कोमध्ये आधीपासून 500 बेडचे जम्बो कोरोना सेंटर असून त्यात आता अधिक 224 बेडची भर पडणार आहे.

रुग्ण ठणठणीत बरा होऊन घरी परतेल!
मुंबई महानगरपालिकेच्यावतीने या परिसरातील नागरिकांसाठी अत्याधुनिक आरोग्य सोयीसुविधेने परिपूर्ण जम्बो कोवीड समर्पित रुग्णालय उभारण्यात आले आहे. लवकरच हे रुग्णालय लोकांच्या सेवेत समर्पित होणार असून या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टर व संलग्न कर्मचाऱयाची जबाबदारीसुद्धा तेवढीच महत्त्वपूर्ण आहे. या ठिकाणी आलेला रुग्ण हा ठणठणीत बरा होऊनच गेला पाहिजे, यासाठी सर्वांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे महापौरांनी सांगितले. या ठिकाणी बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱयामधून रुग्णांवर 24 तास लक्ष देणे सोयीचे होणार आहे. यावेळी उपमहापौर ऍड. सुहास वाडकर, आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले, नगरसेवक डॉ. राम बारोट, माजी नगरसेवक विनोद शेलार, सहआयुक्त (विशेष) आनंद वाघराळकर, नेस्कोच्या कोविड समर्पित रुग्णालयाच्या डॉ. नीलम अंद्राडे, म. वा. देसाई रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पिंपळे, विभागप्रमुख सुधाकर सुर्वे उपस्थित होते.