
नेस्ले कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) लॉरेंट फ्रेक्स यांना कंपनीतील एका पीएसोबत असलेले प्रेम प्रकरण चांगले भोवले आहे. कंपनीला या प्रेम प्रकरणाची माहिती समजताच कंपनीने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. प्रेम प्रकरणाची कोणतीही माहिती कंपनीला देण्यात आली नाही. सीईओ यांनी कंपनीच्या नियमांचे उल्लंघन केले आहे, असे सांगत कंपनीने सीईओ यांना नोकरीवरून काढून टाकले आहे.
लॉरेंट फ्रेक्स यांना पदावरून हटवल्यानंतर आता त्यांच्या जागी कंपनीने वरिष्ठ उपाध्यक्ष आणि नेस्लेच्या कॉफी स्ट्रटेजिक बिझनेस युनिटचे प्रमुख फिलिप नवरातिल यांची नवीन सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे.
सीईओ यांच्यावर कारवाई करणे आवश्यक होते. कारण, कंपनीची मूल्ये आणि तत्त्वे आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. जर कोणी एखादी व्यक्ती कंपनीच्या तत्त्वांना तडा जाऊ देत असेल तर ते कंपनी कदापि सहन करणार नाही. मी लॉरेंटच्या वर्षानुवर्षांच्या सेवेबद्दल त्यांचे आभार मानतो, असे कंपनीचे अध्यक्ष पॉल बुल्के यांनी म्हटले आहे.