नेवासा तालुक्यात महावितरणचा सावळा गोंधळ, आमदार शंकरराव गडाखांचा आंदोलनाचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नेवासा तालुक्याच्या बहुतांश भागात वीज वितरणात मोठय़ा प्रमाणावर सावळा गोंधळ निर्माण झालेला असून, महावितरण प्रशासनाकडून त्यात सुधारणा करण्याऐवजी कानाडोळा करण्यात येत आहे. महावितरण प्रशासनाला हाताशी धरून राजकीय साठमारीसाठी तालुक्यातील शेतकऱयांचा जाणीवपूर्वक छळ होत आहे. दरम्यान, महावितरणच्या कार्यपद्धतीत सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आमदार शंकरराव गडाख यांनी दिला आहे.

तालुक्यात 21 वीज उपकेंद्रे कार्यान्वित असून, सर्वच उपकेंद्रांतून विद्युत पुरवठा कमी दाबाने केला जात असून, अनेक सबस्टेशन ओव्हरलोड आहेत. यामुळे नेवासा तालुक्यातील गावागावांत विजेचा पुरता खेळखंडोबा झाला आहे. पुरेशा दाबाने वीजपुरवठा होत नसल्याने विहिरी, कूपनलिकांना पाणी असूनही पिकांना देता येत नसल्याने पिके जळत असल्याची विदारक परिस्थिती झाली आहे. विद्युतवाहक तारा जीर्ण झालेल्या असल्याने थोडे जरी वादळ झाले तरी तारा तुटून विद्युत पुरवठा खंडित होतो व सदर तारा जोडण्यास मोठा कालावधी लावला जात आहे. तालुक्यात 200 ते 250 विद्युत खांब पडलेले असून, वीज तारा अक्षरशः लोटांगण घेत असल्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची भीती निर्माण झालेली आहे.

मोडकळीस आलेले खांब उभे करण्यास 4 ते 5 महिने उलटून जातात प्रसंगी शेतकरी, ग्रामस्थ परिस्थिती नसूनही स्वतः खर्च करून पदरमोड करून खांब उभे करतात, तालुक्यातील अनेक विद्युत रोहित्रे (डीपी) यांना ऑईल, वापराची केबल, फ्यूज यांचाही पुरवठा केला जात नाही. विद्युत रोहित्रे महावितरणमार्फत भरून न देता शेतकऱयांना खासगी ठिकाणाहून भरून आणावे लागत आहे.

पाथरवाला, सुकळी, पिंप्री शहाली, पाचेगाव, पुनतगाव, जैनपूर, लोहोगाव, धनगरवाडी, मांडेगव्हाण, शिंगवेतुकाई, बेल्हेकरवाडी, खेडलेपरमानंद, शिरेगाव, अंमळनेर, निंभारी, खुपटी, हंडीनिमगाव, उस्थळदुमला, बाभुळवेढा, रस्तापूर, प्रवरासंगम, गळनिंब, मंगळापूर, खडका, घोगरगाव, सलाबतपूर, गोलगाव, खेडलेकाजळी या गावांमध्ये दररोज विजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे ग्रामस्थ मेटाकुटीला आले आहेत.

महावितरणनने नेवासा तालुक्यात लवकरच कामे सुरू न केल्यास तालुक्यातील त्रस्त शेतकरी, ग्रामस्थांसह तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आमदार शंकरराव गडाख यांनी दिला.

नवा ट्रान्सफॉर्मर आठ दिवसांत पुन्हा जळाला

करजगाव सबस्टेशनचा पॉवर ट्रान्सफॉर्मर जळाल्यानंतर महावितरणच्या अधीक्षक अभियंत्याच्या हलगर्जीपणामुळे एक महिन्यानंतर बसविण्यात आला. हा बसविलेला नवा ट्रान्सफॉर्मर त्यानंतर अवघ्या आठच दिवसांत पुन्हा जळाल्याने शेतकरी वैतागले आहेत.