कोल्हापूरात आणखी 12 रुग्ण आढळले; जिल्ह्यात 136 कोरोनाबाधित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई, पुणे, सोलापूर आदी रेडझोनमधून कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्यांमुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत मंगळवारी 40 रुग्णांची भर पडली. यामुळे जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 122 वर पोहोचली असतानाच बुधवारी सकाळी शासकीय आकडेवारीनुसार यामध्ये आणखी 12 रूग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे दुपारपर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या एकूण 136 झाली आहे.

सीपीआर प्रशासनाच्या आकडेवारीनुसार मंगळवारी सकाळी कोरोनाबाधितांची संख्या 83 झाली. तर सायंकाळी 6 वाजेपर्यंत यामध्ये नव्या 40 रुग्णांची भर पडली. यामध्ये दिवसभरातील चार आणि पुणे येथील बी.जे. मेडिकल कॉलेज प्रयोगशाळेतून आलेले 35 पॉझिटिव्ह अहवाल अशा 40 जणांचा समावेश आहे. बुधवारी सकाळच्या सीपीआर प्रशासनाच्या आकडेवारीनुसार आणखी 12 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण कोरोनाबाधितांची संख्या 136 झाली आहे. आतापर्यंत एकूण 13 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे.तर दोघांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या 121 जणांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक 39 कोरोनाबाधित रुग्ण शाहुवाडी तालुक्यात आहेत. भुदरगड 17, राधानगरी 15, आजरा,करवीर,पन्हाळा तालुक्यात प्रत्येकी 10, चंदगड 5, गडहिंग्लज 4, गगनबावडा 2 तर हातकणंगले,कागल आणि शिरोळ तालुक्यात प्रत्येकी 1 शिवाय नगरपालिका क्षेत्रात 6 आणि महानगरपालिका क्षेत्रात 12 अशी कोरोनाबाधितांची संख्या आहे. इतर जिल्ह्यांत तीन रुग्णांचा समावेश आहे.

प्रशासनाचा सावळा गोंधळ कायम

रेडझोनमधून येणाऱ्यांची संख्या आणि त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या यामुळे कोल्हापुरकरांची धास्ती वाढत असताना जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेतील सुसंवादाच्या अभावाने, गोंधळात गोंधळ निर्माण झाला. त्यात कोरोनाबाधित रुग्णांची नेमकी संख्या किती यामुळे प्रशासनाचा गोंधळ समोर आला आहे. प्रशासनावर टीका झाल्याने माहिती व सुसंवादासाठी आरोग्य यंत्रणेकडून सकाळी 10 आणि रात्री 10 वाजता मेडिकल बुलेटिन जाहिर करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले. यासाठी नवीन समिती स्थापन करुन छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक,वैद्यकीय अधीक्षक डॉ. तेजस्वीनी सांगरुळकर, जिल्हा परिषदेच्या सर्वेक्षण अधिकारी डॉ .उषादेवी कुंभार यांची नेमणूक दररोज कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी अद्ययावत ठेवण्यासाठी करण्यात आली. मात्र, पहिल्याच दिवशी सकाळी 10 वाजण्याची माहिती दुपारी 2 वाजले तरी मिळाली नव्हती.त्यामुळे प्रशासनाच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.