
सामना प्रतिनिधी । मुंबई
धारावीच्या पुनर्वसनासाठी रेल्वे मंत्रालयाने राज्य सरकारला 45 एकर मोकळी जागा दिली आहे. या जागेमुळे धारावीच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला असून पुनर्वसनाव्यतिरिक्त राहिलेल्या जागेत वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या (बीकेसी) धर्तीवर नवे संकुल उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत दिली.
धारावीच्या विकासासाठी एसपीव्ही मॉडेल तयार केले आहे. त्यासाठी उच्चाधिकार समिती नेमण्यात आली आहे. पुनर्वसनासाठी रेल्वेची जागा मिळाल्याने प्रकल्पाच्या निविदा निकषात बदल करावा किंका कसे याबाबत महाधिवक्त्यांचा अभिप्राय घेण्यात येणार आहे. त्यांच्या अभिप्रायानुसार निविदा प्रक्रिया राबवली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची अतिक्रमण धारकांच्या पुनर्वसन योजनेला गती देण्यात आली आहे. त्यासाठी म्हाडा आणि एसआरएला जमीन दिली आहे. आदिवासी पाड्यांचे पुनर्वसन नियमानुसार केले जाईल. त्यांना बसवी घरे व परसाची जागा देण्यात येईल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
























































