
रस्ते वाहतुकीला पर्याय म्हणून काही महिन्यांपूर्वी विरार ते जलसारदरम्यान रो-रो सेवा सुरू करण्यात आली. त्याचा प्रवाशांना चांगला फायदा होत असतानाच रो-रोमुळे नवजात बाळाचे प्राण वाचल्याची घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली. जलसार ते नारंगी जेट्टीपर्यंत 20 मिनिटांत रुग्णवाहिकेने रो-रोद्वारे खाडी पार केल्याने त्या बाळाला विरारच्या रुग्णालयात तातडीने दाखल करता आले. तिथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. आता त्या बाळाची प्रकृती स्थिर आहे.
सफाळे गावातील विराथनखुर्द येथे राहणारी अस्मिता जाधव ही महिला रात्री उशिरा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी दाखल झाली. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. मात्र थोड्याच वेळात त्या बाळाला श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रात आधुनिक उपचार यंत्रणा नसल्याने त्याला लवकरात लवकर मोठ्या रुग्णालयात नेणे आवश्यक होते. बाळाला विरारच्या रुग्णालयात रुग्णवाहिकेतून रस्त्याने नेण्यासाठी किमान दीड ते दोन तासांचा कालावधी लागला असता.
जोखीम पत्करली
नातेवाईकांनी जलसारचे उपसरपंच विकोष म्हात्रे यांना आपली अडचण सांगितली. त्यांनी लगेच जेट्टीचे व्यवस्थापक यांना आपल्या जेट्टीने रुग्णवाहिकेसह बाळाला व तिच्या आईला खाडी पार करून नेण्याची विनंती केली. लगेच रुग्णवाहिकेतून नवजात बाळ व तिच्या मातेला 15 ते 20 मिनिटांत खाडीच्या पलीकडे सुखरूपपणे पोहोचवले. त्यानंतर रुग्णवाहिका विरारच्या अभिनव रुग्णालयात दाखल झाली. तेथे उपचार केल्यानंतर त्याला मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात नेण्यात आले असून बाळाची प्रकृती आता सुधारत आहे.