पवार–शहा भेटीत साखरेवर चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंधरा दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यापाठोपाठ पवार यांनी मंगळवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने राजकीय तर्कवितर्क काढले जात आहेत. मात्र, शरद पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही भेट नेमकी कशासाठी होती? याविषयी माहिती दिली आहे.

शरद पवारांनी ट्विट करून या भेटीविषयी माहिती दिली आहे. या भेटीदरम्यान, देशातील साखर उद्योगाची परिस्थिती आणि साखरेच्या अतिरिक्त उत्पादनामुळे निर्माण होणाऱ्या समस्या यावर चर्चा झाल्याचे पवार यांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाच्या वतीने अमित शहा यांना देण्यात आलेले निवेदनच त्यांनी ट्विटरवर पोस्ट केले आहे.