ठाणेकरांच्या विरंगुळय़ासाठी नवी गायमुख चौपाटी, आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईपाठोपाठ झपाटय़ाने बदलणाऱया ठाणे शहरातील नागरिकांसाठी आज नवीन विरंगुळय़ाचे केंद्र असलेल्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौपाटीचे अनावरण करण्यात आले. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ही देखणी चौपाटी व वनस्थळी उद्यान ठाणेकरांसाठी खुले करण्यात आले. यासोबतच आगरी-कोळी भवन, गायमुख घाटाचेही भूमिपूजन करण्यात आले. त्यामुळे शिवसेनेकडून ठाणेकरांना स्वातंत्र्य दिनाची ही अनोखी भेटच मिळाल्याने त्यांच्या आनंदात भर पडली आहे.

ठाणे शहराला 32 किमीचा खाडीकिनारा लाभला आहे. या खाडीकिनारी वॉटर फ्रंट विकसित करण्याचे काम ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सुरू होते. त्यानुसार आज त्याच्या पहिल्या टप्प्याचे अर्थात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौपाटीचे लोकार्पण करण्यात आले. या ठिकाणी नागरिकांच्या विरंगुळय़ासाठी विविध साधने, गायमुख टेकडीसमोर असलेल्या देखण्या खाडीकिनाऱयाचे सुशोभीकरण करण्यात आले असून यालगतच गायमुख घाटाचेही भूमिपूजन आज शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

शिवसेना नेते, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना आमदार, मीरा-भाईंदर संपर्कप्रमुख प्रताप सरनाईक यांनी या चौपाटीच्या उभारणीसाठी पाठपुरावा केला. दरम्यान, मानपाडा येथील टिकुजिनीवाडीसमोर असलेल्या वनस्थळी उद्यानाचे व कासारवडवली येथील आगरी-कोळी भवनाचेही भूमिपूजन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर मीनाक्षी शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, मीरा-भाईंदर जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, सभागृह नेते नरेश म्हस्के, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, विभागप्रमुख दिलीप ओवळेकर, उपायुक्त संदीप माळवी, युवासेनेचे सचिव पूर्वेश सरनाईक, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर, नगरसेवक अमर पाटील, पद्मा भगत, नरेंद्र सूरकर, परिषा सरनाईक, नम्रता घरत, सिद्धार्थ ओवळेकर, रवी घरत, साजन कासार आदी उपस्थित होते.

सर्वसामान्यांचा विचार करणारा एकमेव पक्ष
ठाण्यातील विविध विकासकामांची मुंबई शहरात कॉपी केली जात आहे. इतक्या वेगाने ठाणे शहराचा कायापालट होत आहे. ठाण्याचा चेहरा बदलण्यासाठी सर्व यंत्रणांना नेहमीच पाठबळ दिले जात आहे. देशात प्रथमच अंतर्गत मेट्रो या शहरातच धावणार आहे. त्यामुळे शिवसेना ठाणेकरांच्या गरजांचा विचार करणारा एकमेव पक्ष असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

‘ते’ कोणाची पोलखोल करणार?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेनंतर काँग्रेसकडून पोलखोल यात्रा सुरू करण्यात येणार आहे. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारताच काँग्रेस यात्रेच्या माध्यमातून स्वतःची पोलखोल करणार का, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.